आमदार सोळंकेंकडून चौकशीची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला अहवाल
माजलगांव, प्रतिनिधी – कोट्यवधीच्या भ्रष्टाचारप्रकरणी राज्यात गाजलेल्या माजलगांव नगरपालिकेतील नवनवीन प्रकरणे बाहेर येताहेत . पालिकेतील पदाधिकारी , अधिकाऱ्यांनी संगनमत करून मागील चार वर्षांपासून चक्क १८२ रोजंदारी कर्मचाऱ्यांची विविध विभागांत बेकायदेशीर नेमणूक केली आहे .
यात पाणी फिल्टर लेबर २४ , विद्युत विभाग सहा , अग्निशामक दल १५ , तात्पुरते साफसफाई , झाडूमार कर्मचारी ९२ , फिक्स पे वसुली कर्मचारी पाच , नगराध्यक्ष , माजी नगराध्यक्ष यांच्या वैयक्तिक कामासाठी ४० असे एकूण तब्बल १८२ कर्मचारी बेकायदा नेमली आहेत . त्यांच्या पगारापोटी महिन्याला लाखोचा खर्च करून अगोदरच कंगाल असलेल्या पालिकेवर मोठा भुर्दंड लादला आहे . कर्मचाऱ्यांची नियमबाह्य नेमणूक करणाऱ्या पदाधिकारी , अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून आर्थिक वसुली करण्यात यावी , अशी तक्रार आमदार प्रकाश सोळंके यांनी सात एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती . याची दखल घेत सदर प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी तत्काळ स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी ता . १७ एप्रिल रोजी मुख्याधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात दिले आहेत . यामुळे पालिकेतील रोजंदारीवर लागलेल्या तब्बल १८२ कर्मचाऱ्यांवर संक्रात येण्याची शक्यता नाकारता येत नाही .
——-चौकट————
दोन कर्मचाऱ्यांच्या नावावर १८२ जणांचे पगार
नियमबाह्य नेमणूक केलेल्या १८२ कर्मचाऱ्यांचा महिन्याचा पगार त्यांच्या खात्यावर न टाकता पालिकेतील साफसफाई मुकादम सिकंदर खान बडे खान ऊर्फ बाबू , जावेद इनामदार यांच्या वैयक्तिक नावाने धनादेश काढण्यात येतो असेही आमदार सोळंके यांनी तक्रारीत नमूद केले आहे .
——-चौकट————
नगराध्यक्ष , माजी नगराध्यक्षांच्या घरी ४०
कर्मचारी
बेकायदा नेमणूक केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांपैकी चक्क ४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती नगराध्यक्ष , माजी नगराध्यक्षांच्या वैयक्तिक कामासाठी केलेली आहे . १८२ पैकी फक्त नावालाच असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारी कोणाच्या घशात जातात हे मात्र न उलघडणारे कोडे आहे .
——-चौकट————
चार वर्षांत सव्वा सहा कोटीचा भुर्दंड
चार वर्षांपासून नियमबाह्य नेमलेल्या एका कर्मचाऱ्याला महिन्याला अंदाजे सात हजार पगार दिला जातो . याप्रमाणे १८२ कर्मचाऱ्यांच्या पगारीवर मागील चार वर्षांत जवळपास सहा कोटी २४ लाख रुपयांचा भुर्दंड झाल्याचे उघड होते .
————–चौकट————–
“जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चारसदस्यीय समिती नेमली आहे . कर्मचाऱ्यांना कधी घेतले , ठराव घेतला होता का याबाबी तपासून अहवाल पाठविण्यात येणार आहे .
– भागवत बिघोत , प्रभारी मुख्याधिकारी.