- २० वर्षांत बोगस कर्मचाऱ्यांवर २१ कोटींचा खर्च
माजलगांव (प्रतिनिधी):- येथील नगर पालिकेतील तब्बल १८२ बेकायदेशीर व बोगस रोजंदारी कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून मुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्यानंतर पुढील कारवाईस वेग आला आहे . जिल्हा प्रशासनाने २० वर्षात पदावर कार्यरत असलेल्या मुख्याधिकाऱ्यांची यादी मागवली असून , या काळात वरील १८२ कर्मचाऱ्यांच्या पगारावर तब्बल २१ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा कयास आहे .
दरम्यान , या नियुक्ती बाबत पदाधिकारी व मुख्याधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश असल्याने पदाधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे .
येथील नगर परिषदेत सत्ताधारी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या विरोधात आ . प्रकाश सोळंके यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे .
नगरपरिषदेत बोगस कर्मचारी मोठया प्रमाणात असल्याने परिषदेवर आर्थिक भुर्दंड लादलेला असल्याने यात चौकशी व कार्यवाही करण्याची तक्रार आ . सोळंके यांनी केली होती . याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी २००० पासून रोजंदारी कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलेल्या वेतनाची रक्कम तत्कालीन मुख्याधिकारी व कर्मचारी यांच्या नावासह परिपूर्ण अहवाल सादर करण्याचे ८ जून रोजी आदेश देण्यात आले .
आता या कारवाईस वेग आला असून , यादी तयार करण्यात येत आहे . या २० वर्षात किमान ५० मुख्याधिकारी बदलले असावेत , असा अंदाज आहे . सध्या माजलगांव नगर परिषदेचे हे प्रकरण चांगलेच गाजत असून , या प्रकरणावर नागरिकांत चवीने चर्चा केली जात आहे .
वीस वर्षांतील वेतनाची अंदाजित रक्कम
• नगर परिषदेत फिल्टर लेबर २४ ( ४ कोटी ३ लाख ) , फिक्स पे वसुली कर्मचारी ५ ( ८४ लाख ) , विद्युत विभाग कर्मचारी ६ ( ६८ लाख ) , अग्निशमन दल कर्मचारी १५ ( ३ कोटी २४ लाख ) , तात्पुरते साफसफाई कर्मचारी ९ २ ( ८ कोटी १४ लाख ) तसेच नगराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष यांच्या वैयक्तिक कामावरील कर्मचारी ४० ( ४ कोटी ६० लाख ) असे एकूण १८२ कर्मचारी यांच्या वेतनापोटी दरमहा १० लाख रुपये खर्चाच्या नोंदी आहेत .
याप्रमाणे २० वर्षात एकूण अंदाजे २१ कोटी रुपये खर्च झाला असावा असा अंदाज येथील कर्मचारी वर्गातून वर्तवण्यात आहे . १८२ पैकी १ ९ ० कर्मचाऱ्यांच्या नावावर पदाधिकारीच पगार उचलत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे .
खोरे , झाडू , टोपल्यावरही खर्च
दरम्यान नगर परिषदमध्ये कर्मचारी बोगस असल्याच्या आ.सोळंके यांच्या तक्रारीनंतर नवीन प्रश्न उपस्थित होत आहे . मागील २० वर्षात सदरील १८२ कर्मचाऱ्यांच्या नावावर दाखवण्यात आलेल्या साहित्य व कामावर देखील करोडो रुपये खर्च केल्याचा अंदाज आहे .
यामध्ये खोरे , टोपली , झाडू , डिझेल , ट्यूब – टायर , यासह इतर साहित्यावर देखील मोठा खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे . त्याची पण चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे .
“आपण संपूर्ण २० वर्षातील किती मुख्याधिकारी , पदाधिकारी होते याची माहिती मागवली आहे . ती मिळाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल . – मिलिंद सावंत , जिल्हा प्रशासकीय अधिकारी , नगर परिषद प्रशासन बीड .