मासिक पाळीच्या काळामध्ये सर्व स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन्स कमी किमतीत, परवडणारे व सहज उपलब्ध व्हावे याविषयी भारतामध्ये अनेक मोहिमा राबविण्यात आल्या. ज्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले. पण सॅनिटरी पॅडचा खर्च दर महिना आणि अनेक वर्ष करावे लागते. शिवाय ते वापरल्यावर त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावणे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नुकतेच माझ्या अभ्यासात असे वाचण्यात आले की, भारतात सुमारे 3.6 कोटी स्त्रिया मासिक पाळीत सॅनिटरी पॅड वापरतात. दर महिन्याला 12 नॅपकिन या हिशोबाने वापरलेल्या 43 कोटी नॅपकिनचे वजन 5000 टन होईल. कुठलेही सॅनिटरी नॅपकिन नष्ट व्हायला शेकडो वर्षे जावी लागतील. म्हणजेच वापरून फेकून देत असलेल्या पॅडचा विचार केल्यास दररोज प्रदूषणामध्ये किती फरक पडत आहे, त्याचा पर्यावरणावर किती विपरीत परिणाम होत आहे याची आपल्याला कल्पना येईल म्हणूनच आता एक पर्याय समोर येत आहे तो म्हणजे ‘मेन्स्ट्रुअल कप’.
मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमात एका ठिकाणी मला विचारलं गेलं की “मॅडम, पाळीमध्ये तुम्ही काय वापरता?”.
तेंव्हा मला तिचा प्रश्न फार आवडला कारण मासिक पाळी व्यवस्थापन विषयी आपल्याला समुपदेशन करणाऱ्या मॅडम काय वापरतात या बद्दल तिच्या मनात कुतूहल होते जाणून घ्यायचे होते. पूर्वी मीही सर्वसामान्यपणे बाजारात उपलब्ध असणारे सॅनिटरी पॅड वापरायचे. पण हे पॅड वापरतांना बऱ्याच वेळेला मला Rash किंवा इन्फेक्षण ला सामोरे जावे लागत असे. मग मी त्यास पर्याय म्हणून केमिकल फ्री एनीयन शीट पॅड चा वापर सुरू केला जो आम्ही स्वतः तयार करत होतो. पण तरी जास्त वेळ पॅड बदलता नाही आले तर त्याचा त्रास व्हायचा.
असेच एकदा आम्ही मैत्रिणीबरोबर गप्पा मारत असतांना माझ्या एका मैत्रिणीने सांगितले की “मी मेन्स्ट्रुअल कप चा वापर करते आणि कप खूप छान आहे.” मुंबईची मैत्रीण सुद्धा अशीच बोलली की “हल्ली पुण्या मुंबईत महिला पॅड पेक्षा कप लाच प्राधान्य देतात”.
या चर्चेनंतर मी काही व्हिडीओ, वेबिनार अटेंड केले मग मला देखील उत्सुकता निर्माण झाली की आपण सुद्धा कप वापरून पहायला काय हरकत आहे? आणि ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली तर त्याने लगेच ऑनलाईन 400/- किंमतीचा कप मागवून दिला. मागील साधारणतः दीड वर्षांपासून मी कप वापरत आहे.
सुरवातीला पहिल्यांदा कप इन्सर्ट करतांना मनात थोडी भीती आणि चिंता होती. पाळी आल्यावर तर मी वारंवार बाथरूम मध्ये जाऊन चेक करू लागले. की कप मुळे मला स्टेनिंग अथवा डाग तर लागत नाही ना? कप नेमका कसा आत योनीमार्गात बसतो आणि आपण तो कसा कॅरी करावा ? मग हळूहळू मी सर्व गोष्टींशी एकरूप होऊ लागले. कप वापरतांना येणाऱ्या अडचणी की जेंव्हा पहिल्यांदा कप वापरला त्यावेळेस तो योनीमार्गात आत टाकताना मनामध्ये खूप भीती होती की ‘C’ फोल्ड ओपन होईल की नाही ? हाऊ इट एक्साक्टली वर्क ? ह्यासर्व प्रश्नाबद्दल माझ्या मनात विचारांचे चक्र सुरू झाले.
पहिला महिना जेमतेम थोडी स्टेनिंग, थोडं घाबरणे ह्यावरून गेलं. पुढील महिन्यात कप योनीमार्गात टाकताना त्याचा स्टेम हा चुकून थोडा बाहेर राहिला त्यामुळे मला Vaginitis (योनी मार्गातील सर्व सामान्य Infection अर्थात योनी मार्गातील दाह) चा त्रास सुरू झाला. हा त्रास तीव्र स्वरूपाचा होता पण होमिओपॅथिक औषधीने तो बरा झाला. पण हा त्रास पाहता माझ्या नवऱ्याने चिडून “तू कप का वापरतेस ? जर तुला इतका त्रास होत असेल तर” असे म्हणाला. पण तरी मला माहित होतं की दोष कप चा नसून तांत्रिक बाबतीत मी कुठे तरी चुकतंय आणि कप तर मासिक पाळीतील शोषकांपैकी एक शाश्वत उपाय आहे. मग कप कसे वापरावे याविषयी मी youtube वर विविध व्हिडीओ पाहत गेले. ज्यामुळे माझ्या मनातील भीती कमी होण्यास मदत होत गेली. त्यानंतर मी हळूहळू शिकू लागले. मग काय जमले की.
त्यानंतर तर पाळी चालू आहे ही गोष्ट सुद्धा विसरून गेले कारण कप वापरताना तुम्हाला पॅड वापरताना येणाऱ्या कोणत्याच गोष्टी जसे friction मुळे होणारी rash, itching आदी समस्या येत नाहीत.
आता बघता बघता जवळपास दीड वर्षापासून मी कप वापरते. मला स्वतःला ‘पॅड फ्री पिरिएड्स’ चा अनुभव येत आहे. ह्या कप मुळे मला पाळी सुरू आहे याची देखील जाणीव होत नाही. शिवाय कप वापरण्यास एकदम सोपा, तो गरम पाण्याने धुवून स्वच्छ करून योनी मार्गात सरकवताना कुठलाही त्रास होत नाही. तो कधी आपोआप बाहेर येत नाही. कप जेंव्हा रक्ताने भरला की तो आपोआप खाली सरकतो आणि आपण तो घालतांना किंवा काढतांना कुठलाही त्रास किंवा इजा होत नाही.
कप चा वापर केल्यामुळे साधारणतः एका वर्षात मला 800-960/- इतकी बचत झाली. शिवाय पर्यावरणाचा विचार केल्यास एका वर्षात साधारणतः 150 -180 पॅड मुळे होणारा संभाव्य कचरा टाळून एक प्रकारे पर्यावरणाची हानी टाळू शकले. शिवाय एक कप आपण साधारणपणे 5 वर्ष वापरू शकतो.
त्याच बरोबर या कप सोबत तुम्ही विसरून जाल की दैनंदिन जीवनात तुमची पाळी सुरू आहे म्हणजे No Peer Pressure of Periods. शिवाय हे कप वापरून तुम्ही आपल्या आवडीच्या गोष्टी जसे की स्विमिंग, रनिंग, वॉटर स्पोर्ट्स मनात कोणतीही भीती न बाळगता करू शकता. या सर्व बाबींचा विचार करता आणि मासिक पाळी व्यवस्थापन समुपदेशक म्हणून मी सांगेल की Menstrual कप हा सर्व दृष्टीने चांगलाच आहे. आणि जास्तीत जास्त महिलांनी त्याविषयी माहिती जाणून घेऊन वापरावा म्हणूनच मी स्वतःचा अनुभव शेअर करत आहे.
डॉ सौ आशा पवन चांडक
होमिओपॅथिक तज्ञ
मासिक पाळी व्यवस्थापन समुपदेशक परभणी
9422925362
(लेखीका या सामाजीक कार्यकर्त्या असून मासीक पाळीवर त्यांनी आतापर्यंत 150 हून अधिक व्याख्याने दिली आहेत.)