मुंबई : – ‘मुंबईसारख्या लोकसंख्येची मोठी घनता असलेल्या शहराकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. आपण प्रयत्नपूर्वक या विषाणूचा संसर्ग रोखला आहे. त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली आहे. वॉशिंग्टन पोस्टनेही कौतुक केले आहे. पण आता आपली आणखी कसोटी आहे. त्यामुळे गाफील न राहता कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.
मुंबईतील कोरोना विषाणूचा प्रतिबंध तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीस परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, महापालिकेचे आयुक्त आय. एस चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह , मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, संजीय जयस्वाल, पी. वेलारसू, सुरेश काकाणी, उपायुक्त तसेच वॉर्डनिहाय सहायक आयुक्त विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच वैद्यकीय तसेच आरोग्य यंत्रणांचे प्रमुख, काही रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मुंबईची परिस्थिती तुम्ही सर्वांनी अहोरात्र मेहनतीने काबूत ठेवली आहे. या कामाची दखल डब्लूएचओ आणि वाश्गिंटन पोस्टने घेतली आहे. आपण कोणतीही माहिती लपवत नाही, याचे कौतुक वाश्गिंटन पोस्टने केले. या कौतुकास्पद परिस्थितीतही आता आपली कसोटी आहे. जगभर जे निरीक्षण आहे, त्यामध्ये आता दुसऱी लाट येईल असे म्हटले जाते. त्यामुळे
आपले प्रयत्न आणखी तीव्रतेने आणि प्रभावीपणे राबवा. दुसरी लाट तेव्हाच येते ज्यावेळी आपण गाफील राहतो. पण आणखी सतर्क राहूया. रुग्ण संख्येचा हा आलेख कमी होईल यासाठी प्रय़त्न करूया. रुग्णाला कमीत कमी अंतरावर उपचारासाठी जावे लागेल अशा सुविधा वाढवायच्या आहेत. सुरवातीला कोरोना शहरात होता. पण आता प्रसार ग्रामीण भागातही होऊ लागला आहे. राज्याच्या अन्य भागातही या सुविधांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. हळूहळू आपण मुंबई खुली करतो आहोत. त्यासाठी कुणाचा दबाव घेण्यापेक्षा आपण नागरिकांच्या जीवांशी बांधिल आहोत, अशा पद्धतीने काम करत आहोत. आपल्याला या सर्व गोष्टी काटेकोरपणे करायच्या आहेत. मुंबईला तुम्हा सर्वांच्या अनुभवातून पूर्वपदावर आणायचे आहे. त्यासाठी यंत्रणांना आणखी सतर्क करा. व्हॅक्सिन येईपर्यंत आरोग्य सुविधांच्या दृष्टीने आणखी काही गोष्टी साध्य करण्याचे प्रयत्न आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईतील नालेसफाई आणि पावसाळ्यातील साथीचे आजार रोखण्याच्या दृष्टीनेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. ते म्हणाले, नाले सफाई वर्षोनुवर्ष करतो. पण साफ झालेला नाला पुन्हा काही दिवसांत कचऱ्याने भरतो. आता कोरोनाच्या निमित्ताने आपल्या टीम बाहेर आहेतच. त्यांच्याकडून या कचरा टाकण्यावर लक्ष ठेवा. मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींकडेही लक्ष देण्याची गरज आहे. त्याठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर आदी अनुषंगिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात याची काळजी घ्या.
आगामी सण वार आणि उत्सवाच्या काळात कोरोनाच्या अनुषंगाने दक्षता घेण्याचे आणि त्याबाबत वेळोवेळी नागरिकांपर्यंत मार्गदर्शक सूचना वेळेत पोहोचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले.
मुंबईतील गणेशोत्सव त्यातील सार्वजनिक तसेच कौटुंबिक उत्सव, गणेशाचे आगमन आणि विसर्जन व्यवस्था तसेच कोकणात गणेशोत्सवासाठी जाऊन येणारे नागरिक यांच्यापर्यंत मार्गदर्शक सूचना, वस्तुस्थितीची माहिती वेळेत पोहोचविण्यात यावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बैठकीच्या समारोपात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या अहोरात्र मेहनतीचे कौतुक करतानाच, जीवावर बेतणारी मेहनत करत आहात. निश्चिंत राहू नका. पण हे काम करतानाही स्वतःची सुद्धा काळजी घ्या. मास्क आणि वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्या, त्याबाबतही गाफील राहू नका, असे आवाहनही केले.
महापालिका आयुक्त श्री. चहल म्हणाले की, गेल्या काही दिवसांत मुंबईतील ८३१ प्रतिबंधित क्षेत्र १५३ ने कमी करण्यात यश आले आहे. सील इमारतींची संख्या कमी करण्यावरही लक्ष केंद्रित करणार आहोत. रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीए आणि महापालिका एकत्र येऊन समन्वयाने डॅशबोर्ड प्रणाली उपलब्ध करून देणार आहोत. धारावीतील बरे झालेल्या काही रुग्णांची पुढच्या पाच दिवसात तपासणी करणार आहोत. त्यातील प्लाझ्मा दान करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम अशांकडून शिबिरात प्लाझ्मा घेण्यात येणार आहे. त्यासाठी हे शिबीर देशात एक वेगळा उपक्रम ठरेल. मोठा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात अँटीजेन चाचण्यांची संख्या वाढविण्यावरही भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिस यांना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. जिथे रुग्ण आढळून येतात, तेथे एकत्रित जाऊन डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात येत असल्याची तसेच २२४ प्रभागात फवारणी सुरु आहे. टाक्यांच्या निर्जंतुकीकरणावर भर देण्यात येत आहे.
महापालिकेच्या रस्त्यांबाबतच्या तक्रारींची प्रणाली अन्य यंत्रणांशी संलग्न करून खड्डे बुजविण्याच्या कामांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
बैठकीत कोरोना प्रतिबंधाबाबत झोपडपट्टी आणि सोसायट्यांच्या क्षेत्रातील परिस्थिती आणि उपाययोजनांची माहिती वॉर्डनिहाय सादर करण्यात आली.
महात्मा फुले ब्रिगेड च्या तालुकाध्यक्षपदी राजेश मगर यांची नियुक्ती