हिंगणघाट (जिल्हा वर्धा) दि.२४
मोहता गिरणीचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात यावा,बंद गिरणी ताबड़तोब सुरु करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी मागणी काल जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे दालनात आयोजित बैठकी दरम्यान हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी केली.
दि.२३ रोजी आयोजित बैठकीमधे आमदार कुणावार यांचेसह,इंटुकचे पदाधिकारी आफताबखान,गिरणी व्यवस्थापनाचे प्रतिनिधी श्रीयुत सिंग, प्रदीप हरणे तर शासनाच्या कामगार विभागातर्फे कामगार अधिकारी श्रीयुत भगत,पानबुडे इत्यादि उपस्थित होते,यावेळी सदर बैठकीत महावितरणचे उपव्यवस्थापक,कामगार राज्य विमा योजनेचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते.
कोरोनाकाळात संचारबंदीचे कारण देत गिरणी व्यवस्थापणाने टाळेबंदी जाहिर करीत कामगारांना वाऱ्यावर सोडले असून त्यांचे कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काल जिल्हाधिकाऱ्यांचे दालनात संपन्न झालेल्या सभेमधे सर्वप्रथम कामगारांचे थकित वेतन व इतर देणी तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली.
मोहता गिरणी कामगारांचा प्रश्न आता गंभीर होत चालला असून यावर तात्काळ निवाडा होऊन गिरणी सुरु करने आवश्यक आहे,येथे तोडगा न निघाल्यास हा गिरणी कामगारांच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्याने थेट मुख्यमंत्र्याच्या दरबारी मांडण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार समिर कुणावार यांनी उपस्थित गिरणी कामगारांना दिले.