यूट्यूबवर पाहून बॉम्ब तयार केला, पण निकामी न करता आल्याने गाठले थेट पोलिस ठाणे

नागपूर: हल्लीचे तरुण टेक्नोसॅव्ही झाले आहेत, असे वारंवार सांगितले जाते. या तंत्राचा आधार घेऊन अनेकजण धाडसही करतात. पण, हेच धाडस कधी कधी कसे अंगलट येते, हे नागपुरातील राहुल पगाडे या २५ वर्षीय तरुणाला पटले आहे. मात्र, ही समज येईस्तोवर आता बराच उशीर झाला आहे. कारण त्याची रवानगी आता पोलीस कोठडीत झाली आहे
यूट्युब वरील माहितीचा आधार घेऊन बॉम्ब तयार करण्याचा धाडसी प्रयोग या तरुणाला महागात पडला आहे. यूट्युबवरील व्हिडिओचा आधार घेऊन राहुलने स्फोटकांपासून बॉम्ब सदृष्य एक डिव्हाइस तयार केले. मात्र, हा बॉम्ब निकामी कसा करायचा, हे तंत्र त्याला माहिती नव्हते. त्यामुळे राहुलची घाबरगुंडी उडाली. त्यासाठी त्याने एक युक्ती लढविली… या बॉम्बचे सर्किट त्याने एका बॅगमध्ये भरले. ही बॅग घेऊन तो नंदनवन पोलीस ठाण्यात आला. केडीके टी पॉइंट जवळ ही बॅग आपल्याला बेवारस सापडल्याची कहाणी त्याने रचली.
पोलिसांनी बॅग तपासली असता त्यात इलेक्ट्रिक सर्किट दिसले. सोबतच मोबाइल बॅटरी, काही वायर्सचे तुकडे, एक लायटर, एक बल्ब आणि एक साधा मोबाइल अशा वस्तू त्यांना बॅगमध्ये सापडल्या. आय किल यू नागपूर केबीएमए असा मजकूर लिहिलेला कागदही पोलिसांना सापडला. नंदनवन पोलिसांनी लगेच बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले गेले… पथकाने रात्री उशिरा त्यात कमी प्रतीचे स्फोटक ( गावठी बॉम्ब सदृश ) असल्याचे सांगितले… आणि ते निकामी केले…
ज्या ठिकाणी बॅग बेवारस सापडली असे राहुल पगाडेने सांगितले होते, तिथे जाऊन पोलिसांनी जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजचीही झडती घेतली. त्यानंतर राहुलनेच हा बनाव तयार केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मग पोलिसांनी राहुलची उलटतपासणी केली आणि पर्दाफाश झाला. बॉम्ब तयार करून पोलिसांची दिशाभूल करण्याच्या आरोपाखाली राहुल पगाडेला आता अटकही झाली आहे.. आय किल यु नागपूर केबीएमए हा संदेश कोणाला उद्देशून होता, याचा तपास आता पोलीस करीत आहेत.

Comments (0)
Add Comment