राजगुरूनगर, प्रतिनिधी – खेड तालुक्यात शुक्रवार (दि. १८) रोजी कोरोनाचे ११५ नवे रुग्ण आढळले आहेत. राजगुरुनगर, चाकण, आणि आळंदी शहरात मिळून ३५ तर ग्रामीण भागात ८० रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आत्तापर्यंत एकूण ५५२४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातील १५९ जण बरे झाले असून ४५३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तर आतापर्यंत तालुक्यात १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. आज टाकळकरवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष व राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीतील ६१ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे राजगुरुनगर शहरावर चिंतेचे सावट दिसून येत असल्याचे चित्र आहे.
आज (दि. १८) रोजी राजगुरुनगर, चाकण, आळंदी नगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना सर्वेक्षण मोहीम राबवण्याच्या पहिल्या दिवशी राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीमध्ये एकूण ९२६९ कुटुंब संख्या असून पैकी सायं. साडेपाच वाजेपर्यंत २१७० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात यश आले. सर्वेक्षणानुसार केलेल्या रॅपिड एंटीजन टेस्टमध्ये दोन रुग्ण आढळून आले. मात्र सर्वेक्षणात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसल्याची माहिती राजगुरुनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली.