गंगापूर, सचिन कुरुंद – खरीप हंगाम सुरू होण्याआधीच रासायनिक खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली असून, खत कंपन्यांकडून दरवाढ होणार नाही, असे सांगूनही भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
खरीप हंगाम अवघ्या पंधरा ते वीस दिवसावर आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे सुरू केली आहे. प्रमुख रासायनिक खतांचे दर गगनाला भिडले आहेत; पण शेतमालाला मिळणारा भाव बघता हा भाव शेतकऱ्यांना परवडणार नाही. यावर्षी पुन्हा रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.
तालुक्यात खरिपाची पेरणी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. तत्पूर्वी, शेतकऱ्यांना आपल्या शेतातील काड्या, फने, नांगरणी, वखरणी यासारखी उन्हाळ्यात करण्यात येणारी कामे करायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची वेळेवर धांदल होऊ नये म्हणून मे महिन्याच्या अखेरीस बी-बियाणे, खते खरेदी करून ठेवतात. त्यामुळे दुकानदारांनी देखील खते व बी-बियाणेची संबंधित कंपनीकडे नोंदणी केली आहे. शेतकरी डीएपी हे खत मोठ्या प्रमाणात पिकांना देतात. यावर्षी खताचे भाव वाढल्याने खत मिळेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.३०० रुपये अधिक मोजावे लागणार गतवर्षी डीएपी खताच्या किंमती १२०० रुपये प्रति बॅग होती. यावर्षी एक हजार पाचशे रुपये झाली आहे. शेतकऱ्यांना प्रतिबॅग तीनशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. डीएपी सोबत इतर सर्वच मिश्र खतांची किंमती वाढल्या आहेत. सुपर फास्फेट पोटॅश आदी खतांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे. वर्षभरात कपाशी पिकाला-तीन वेळा खत द्यावे लागते. सोयाबीन पिकाला एकरी एक बॅग खताची आवश्यकता असते. खताच्या किंमतीत सरासरी २५ ते ३० टक्के वाढ झालेली आहे. या भाववाढीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
खतासोबत कीटकनाशकांचीही दरवाढ
खताच्या किंमतीसोबतच तन नाशक, कीटकनाशक यांच्या भावात देखील वाढ झाली आहे. एकूणच उत्पादन खर्च वाढणार आहे आणि शेत मालाचे भाव या तुलनेने कमी वाढत आहे. शिवाय नैसर्गिक संकटाचा फटका पिकांना बसत असतो. येणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसवताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.इंधन दरवाढीमुळे मशागतीचे दर वाढले गेल्या काही दिवसापासून पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी आपले दर देखील वाढवले आहेत. अंतर मशागतीचा खर्च सरासरीपेक्षा दीड पटीने वाढला आहे. बहुतेक शेतकरी आता आंतर मशागत नांगरणी, फंटण, रोटावेटर, पणजी तीनफाळ वाही आदी कामे ट्रॅक्टरने करतात. पण आता भाव वाढल्याने शेतकऱ्यांची बजेट कोलमडणार आहे.
“इंधनाचे भाव वाढल्याने जुन्या भावात शेतीची कामे करायला परवडत नाही. आम्हाला नाईलाजाने भाव वाढवावा लागला. शिल्लक पैसे उरत नाहीत. पूर्वी जेवढे उरायचे तेवढेच उरतात”.
– विलास सोलट, ट्रॅक्टर मालक
“दरवर्षी शेतीचा खर्च वाढत आहे. शेतमालाला मिळणारे भाव मात्र कमी असतात. नैसर्गिक संकटांमुळे कोणतेच पीक पूर्णपणे हाती येत नाही. यामुळे शेती कसणे कठीण झाले आहे. त्यातच खतांचा आणि आंतर मशागतीचा खर्च वाढला आहे. शेतकऱ्याचे जीवन कठीण झाले आहे”.
– संतोष बिरुटे,
शेतकरी, कायगांव
“एकीकडे ‘इफको’चे एमडी पत्रक काढून आणि केंद्रीय मंत्री व्हिडिओ प्रसारित करून भाववाढ होणार नाही, असे सांगतात आणि लगेच भाववाढ जाहीर होते. त्यामुळे शेतकऱ्यांसह कृषी केंद्रचालक संभ्रमात आहेत. केंद्र सरकारला संघटनेकडून विनंती आहे, की कोरोनामुळे शेतमालाला भाव नसल्यामुळे आपण त्यांचे अनुदान वाढवावे म्हणजे खतांची भाववाढ कमी होईल व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल”.
– संदेश गंगवाल
तालुका अध्यक्ष कृषी सेवा केंद्र संघटना गंगापूर