हिंगणघाट (वर्धा) – हिंगणघाट मतदार संघातील लाल नाला व पोथरा प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांचे निवारण होण्यासाठी येथील प्रहारचे धडाडीचे कार्यकर्ते श्री गजू कुबडे हे सन 2013 पासून सातत्याने सनदशीर मार्गाने विविध अभिनव आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेत होते.पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाने या न्याय्य मागण्याची कधी दखल घेतली नाही.मात्र या प्रश्नाची माहिती गजू कुबडे यांनी ना.कडू यांना करून दिली व या विभागाचे जलसंपदा राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू यांनी त्वरित या प्रकरणाची दखल घेत या संदर्भात विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक, नागपूर,यांना हिंगणघाट येथे होणाऱ्या संभाव्य आढावा बैठकीच्या कार्यवाहीसाठी तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार,हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील समुद्रपूर तालुक्यातील पोथरा व लाल नाला प्रकल्पात तेथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे योग्य त्या स्वरूपात पुनर्वसन न झाल्याने तेथील भूमिपुत्र प्रचंड त्रासात जीवन जगत आहेत.या प्रकल्पग्रस्तांनी मागील 40 वर्षात विविध आमदार ,खासदार ,मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले,साकडे घातले पण त्याचा उपयोग झाला नाही.अखेर शेवटी हे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ही बाब प्रहारचे गजू कुबडे यांना सांगितली मागील आठ वर्षांपासून श्री कुबडे हे सातत्याने या प्रकल्पग्रस्तांसाठी झटत आहेत.त्यांनी या न्यायोचित मागणी साठी विविध अभिनव आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.या मागणी साठी त्यांनी २०१३ ला समुद्रपूर तहसील कार्यालयात दीड तास निबाच्या झाडाला उलटे टांगून घेतले.२०१४ मध्ये कडाक्याच्या थंडीत एसडीओ कार्यालय हिंगणघाट समोर उघड्यावर सत्त्याग्रह केला होता.या आंदोलनाची दखल घेत या विषयांवर अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकी घेण्यात आल्या पण बैठकीत घेण्यात आलेल्या निर्देशांचे कोणतेही पालन आजवर झालेच नाही.प्रश्न तसेच पडून होते.या बाबत दि २५ फेब्रुवारी २०२१ ला जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.जुन्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अमंलबजावणी करण्याची मागणी केली त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयावर बैठक लावण्याचे आश्वासन दिले परंतु पाच महिने होऊनही अजून पर्यत बैठक लावण्यात आली नाही.सरतेशेवटी दि २४ जूनला गजू कुबडे यांनी ना बच्चूभाऊ यांची अचलपूर येथे भेट घेतली व त्यांना या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीचे निवेदन दिले. ना.बच्चूभाऊ यांनी तातडीने या निवेदनाची दखल घेत त्याच दिवशी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक नागपूर यांना एक पत्र देऊन हिंगणघाट येथे संभाव्य आढावा बैठक संदर्भात या प्रश्नावर आजपर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
ही आढावा बैठक जलसंपदा राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली येथील उपविभागीय कार्यालय हिंगणघाट येथे होणार आहे.
या प्रकल्पग्रस्तांच्या काही वाढीव मागण्या असून त्यात लिफ्ट इरिगेशन,पोथरा प्रकल्पाच्या डावा कालवा दुरुस्ती,लाल नाला व पोथरा प्रकल्पाचा उपसा केल्यास पाण्याच्या पातळीत वाढ होईल.लाल नाला प्रकल्प अंतर्गत खापरी,चापापूर,गिरगाव कोसरसार येथे मायनर इरिगेशन करून देण्यात यावे, पोथरा प्रकल्प अंतर्गत उजव्या कालव्यावरून वेस्टर्न मायनर इरिगेशन रूनका,निंभा,आरंभा, किन्ही,कवठा, नंदोरी वरून देण्यात यावे ,पोथरा प्रकल्पाच्या वरती वेस्ट विव्हरच्या मार्गावर पुलाचे बंधकाम किंवा कवठा पोच रस्त्यांचे डांबरीकरण करून नदीवर पूल बांधण्या संदर्भात डोंगरगाव पुनर्वसन संदर्भात मंजुरी झालेल्या आठ हजार रुपयांचे वाटप करण्यात यावे व लाल नाला व पोथरा प्रकल्प मधील काही उर्वरित प्रकल्प ग्रस्तांना प्लॉट मिळण्यात यावे इत्यादी या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आहेत.
या विषयावर होणाऱ्या बैठकीकडे सर्व प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागलेले आहे.