राज्य सरकारने तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी
माजलगांव, धनंजय माने – बँड संगीत वादन पथक हे ग्रामीण भागासह शहरी भागात मोठ्या प्रमाणात असुन हि बँड वादन कला ही खूप काळापासून चालत आलेली आहे. या कलेच्या आधारे स्वतः च्या कुटुंबाचा उदरनर्वाह करणारे हजारो कलाकार आपल्या तालुका, जिल्ह्यात आहेत. उन्हाळा आला की बँड पथकांचा सुगीचा काळ असतो. उन्हाळ्यात लग्न समारंभ, उरूस, जत्रा, वेगवेगळे कार्यक्रम आणि अशा कार्यक्रमांना बँड हे ठरलेले समीकरण आहे. परंतु गेल्या एक ते दोन महिन्यांपासून ऐन हंगामाच्या काळात कोरोना विषाणू मुळे लॉकडाऊन करण्यात आलेले असुन त्यामुळे बँड कलाकारांनाच्या हाताला हि काम नाही त्यामुळे पैसे मिळत नाहीत त्यामुळे बँड कलाकार पथक व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी राज्य शासनाने तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
कोरोना विषाणूमुळे सर्व उद्योग, काम-धंदे बंद आहेत यामध्ये आपल्या ग्रामीण भागा सह शहरी भागाची लोककले मध्ये समाविष्ट असणाऱ्या कलेत बँड वादक कला हि फार पुरातन काळापासून चालत आलेली असुन परंतु मध्यंतरीच्या काळात बँड कला हि मागे पडली होती डि.जे. आल्या नंतर बँड पथकाची मागणी कमी झाली होती परंतु डि.जे. वरती निर्बंध आल्यानंतर बॅड पथकाची मागणी पुन्हा जोर धरू लागली. याच काळात अनेक नवीन बँड पथके उभारली गेली ,या पथकात काम करण्यासाठी शेकडो कलाकार तयार झाले यावर्षीच्या सिझन मध्ये कोणती गाणी वाजवायची त्याचा सराव जोरदार सुरू झाला तयारी पण झाली. पण ऐन सिझन मध्येच कोरोनाने देशासह ,राज्यात थैमान घातले आणि या उन्हाळ्यातील सिझन वरती बँड कलाकारांनी पाहिलेली स्वप्न धुळीत मिसळली.
स्वतः सह कुटुंबाची स्वप्न धुळीत मिसळताना पाहून बँड कलाकार नको ते विचार डोक्यात आणत आहेत. आता वर्ष भर काय खायचे ,कसे जगायचे , जमीन जायदात नाही पोट भरण्याचे एकच साधन ते म्हणजे बँड वाजविण्याची कला या वर्षी त्याच्या माध्यमातून होणारी कमाई कोरोणाने हिरावून घेतली. पोरीबळींचे लग्न, लेकरांचे शिक्षण करायचे कसे हा प्रश्न रात्री झोप येऊ देत नाही.
एकीकडे कलाकारांची ही परिस्थिती असतानाच व्याजाने पैसे काढून, कर्ज काढून उभारलेले बँड पथक या वर्षी काहीच कमाई करणार नाही कर्ज फेडायचे कसे. कुटुंब चालवायचे कसे या सिझनसाठी केलेली तयारी आणलेले नवीन साहित्य त्याचे करायचे काय त्याचे पैसे फेडायचे कसे या प्रश्नाने बँड मालकाची झोप उडविली आहे . तसेच या बँड पथक कलाकारांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांची संख्या हजारो आहे. या काळात या आपत्ती मध्ये बँड कला जिवंत ठेवण्यासाठी हे कलाकार जगविणे गरजेचे आहे यासाठी बॅंड कलाकारांना सरकारने प्रत्येकी तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी बँड मालक ,कलाकाराकडुन होत आहे.