लॉकडाऊनमुळे १० एकरवरील मोसंबीला फटका

फुले पिंपळगावच्या शेतकऱ्याचे ८ ते १० लाखांचे नुकसान
माजलगांव, धनंजय माने – तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील चुलत्या . पुतण्याची १० एकर मोसंबीची बाग बहरलेली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे हातातोंडाशी आलेला घास जाण्याच्या मार्गावर असून, मोसंबीला उन्हाचा चटका बसायला सुरुवात झाली आहे. ८ ते १० लाख रुपयांचे नुकसान होण्याच्या मार्गावर असल्याने जाधव कुटुंबिय हवालदिल झाले आहेत.
माजलगांव धरण व पैठण येथून कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोसंबी, चिकू, पपई, डाळिंब, आंबा आदिच्या फळयागा लावल्या आहेत. माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्नही मिळवत आहेत.
शहरापासून ५ कि. मी. अंतरावर फुले पिंपळगाव येथे अमोल अरुणराव जाधव व चुलते अतुल गंगाधर जाधव यांनी १० एक्कर मोसंबीची बाग गत १० वर्षांपासून जोपासली आहे. या ठिकाणी एक हजार झाडे असून, या
ठिकाणी असलेल्या मोसंबीचा पहिला बहार दसऱ्याला गेला होता. यानंतर परतीचा चांगला पाऊस झाल्याने पाण्याची उपलब्धता झाली. ठिबकद्वारे अनेक वेळा पाणी दिल्याने मोसंबीची बाग चांगलीच बहरली.
अनेकवेळा पाणी मिळाल्याने प्रत्येक मोसंबी ३०० ते ३५० ग्रॅम वजनाची भरत आहे. प्रत्येक झाडाला एक हजारापर्यंत मोसंबी लागल्या आहेत. एका झाडाला ३०० किलो मोसंबी भरत असून, मागील दहा वर्षात प्रथमच एवढा माल उत्पादित झाल्याचे जाधव कुटुंबीय म्हणाले.
मार्च महिन्यात मोसंबीला अनेक व्यापारी पाहुन गेले. अनेकांसोबत मोसंबी देण्यासाठी बोलणीही सुरु होती. परंतु अचानक लॉकडाउनमुळे मोसंबी घेण्यासाठी एकही व्यापारी फिरकला नाही. आतापर्यंत मोसंबी बाजारपेठेत जाणे आवश्यक होते. परंतु आता उन्हाचा फटका बसण्यास सुरुवात झाली असून, आणखी १५ दिवस मोसंबीला बाजारपेठ न मिळाल्यास मोसंबी गळायला सुरुवात होईल.
मोसंबी गळाल्यानंतर वेचायलाच मोठा खर्च येतो. त्यामुळे जाधव कुटुंबीय आणखीनच अडचणीत येणाच्या मार्गावर असून, हातातोंडाशी आलेला घास जातांना पाहून जाधव कुटुंबिय गहिवरुन गेले होते.

देश कोरोनामुक्त व्हावा
कोरोनामुळे आमचे हातात आलेले पीक जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे आमचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आमचे नुकसान खूप थोडे आहे परंतु देशाचे नुकसान न भरून येण्यासारखे असून, देश लवकर कोरोनामुक्त व्हावा. यावर्षी नुकसान झाले म्हणून काय झाले? पुढील वर्षी याहीपेक्षा जास्त उत्पन्न काढण्यासाठी प्रयत्न करू.
– अमोल जाधव, मोसंबी उत्पादक शेतकरी

Comments (0)
Add Comment