वनामकृवितील वादग्रस्त कार्यपध्दतीचा पंचनामा भाग-1
परभणी, प्रतिनिधी – मागील काही महिन्यांपासून परभणीतील वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठाच्या (Vasantrao Naik Marathwad Krushi Vidyapeeth) कारभाराचे एकेक किस्से बाहेर येत आहेत. तसेच अनेक वादग्रस्त निर्णयांसह एकूणच कुलगूरू व कुलसचिवांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच आता विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी महागड्या कंपनीसोबत लाखोंचा करार केल्याने नव्याच वादाला तोंड फुटले आहे.
वनामकृविच्या कुलगुरू व कुलसचिवांच्या कार्यपध्दतीवर सध्या मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे. नुकताच विद्यापीठातील बदल्यांचा विषय चांगलाच चर्चिला होता. कारण या बदल्या सूडभावनेतून होत असल्याचा अनेकांचा आरोप आहे. तसेच सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कुठल्याही अधिकारी / कर्मचार्यांच्या बदल्या करू नयेत असे आदेश असतानाही शब्द बदलून नको असलेल्या कर्मचार्यांच्या बदल्या या ना त्या कारणाने करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच या बदल्यांसाठी बदली भत्ता म्हणून अंदाजे एक कोटी रूपयांपर्यंत खर्च येणार आहे.
तसेच विद्यापीठात सध्या प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणार्या कामांची ई-निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू असून याला अनेक संघटना, राजकीय पक्ष व प्रकल्पग्रस्तांनी कडाडून विरोध केला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मार्फत विना तक्रार सर्व कामे सुरळीत सुरू असतानाच मध्येच ई-निविदा का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आता विद्यापीठाच्या सुरक्षा यंत्रणेवरील अर्थपूर्ण व्यवहारांची चर्चा चांगलीच रंगत आहे. जुलै 2019 पर्यंत या विद्यापीठात मेस्को (mesko) या शासन अंगीकृत मंडळाद्वारे सुरक्षा व्यवस्था पुरविली जात होती. मेस्कोच्या सुरक्षेबाबत कुठलेही तक्रार नसतांना विद्यापीठ प्रशासनाने जुलै 2019 पासून विद्यापीठात महाराष्ट्र सुरक्षा बल या नवीन संस्थेस नियुक्त केले. वास्तविकतः मेस्को हे मंडळ माजी सैनिकांना आपले सेवेत सामावून घेत होते. परंतू मेस्कोच्या तुलनेत महाराष्ट्र सुरक्षा बल (maharashtra suraksha bal) या संस्थेची सेवा अत्यंत महागडी असतांना सुध्दा कुलगुरूसह कुलसचिवांनी अर्थपूर्णरित्या या संस्थेची हेतूतः निवड केली. अन् त्याद्वारे 56 सुरक्षा रक्षक तैनात करीत दरमहा लाखों रुपये मौजावयास सुरूवात केली. विशेष म्हणजे विद्यापीठाने या संस्थेस एक महिन्याचे वेतन 16 लाख 1 हजार 260 रुपये अग्रीम म्हणून सुध्दा जमा केले आहे. दर तीन महिन्यांचे वेतन 40 लाख 71 हजार रुपये सुरक्षा ठेव म्हणून सुध्दा जमा केले आहे. विद्यापीठ आणि शासन अधीच अभुतपुर्व अडचणीत असतांना एवढी प्रचंड महागडी सुरक्षा व्यवस्था कोणाचे हितसंबंध जपण्यासाठी तैनात करण्यात आली, असा सवाल चर्चेत आहे.
गंमत म्हणजे यातील सुरक्षा रक्षकांना विद्यापीठ प्रशासनाने निवासाकरिता वर्ग एक दर्जाच्या अधिका-याचे निवासस्थान दिले आहे. हे पुरेशे नव्हते की काय, म्हणून विद्यापीठाचे मानबिंदू म्हणून असलेले पद्मश्री शामरावजी कदम हे शानदार विश्रामगृहही सुरक्षा रक्षकांना निवासाकरिता दिल्या गेले आहे. वास्तविकतः निवासाच्या मागणीकरिता विद्यापीठातील अन्य अधिकारी प्रतिक्षा यादीवर असतांना कुलगुरू व कुलसचिवांनी या सुरक्षा संस्थेवर एवढी कृपा कशासाठी केली, असा सवाल ही केला जातो आहे.
शासन कोरोनासारख्या आपत्तीत मोठ्या प्रमाणात खर्च कपात करून बचत करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच शासनाने सर्वच विभागांना अनावश्यक खर्च टाळण्याचे आदेश दिले आहेत. विद्यापीठानेही कंत्राटी कर्मचार्यांच्या वेतनासाठी पैसे नाहीत म्हणून नुकतेच अनेकांना कामावरून कमी केले तर दुसरीकडे विद्यापीठ प्रशासनाकडून इतर कामांवर एवढी उधळपट्टी का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.