वसतिगृहात क्वारंटाईन केलेल्या नवऱ्याची दारू पिऊन पत्नीस मारहाण

माजलगांव( प्रतिनिधी):- साखर कारखान्यावरून आलेल्या ऊसतोड मजूर कुटुंबांना माजलगाव येथील शासकीय वसतिगृहात क्वारंटाईन केलेले असताना सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून बाहेर पडत दारू पिऊन येऊन पत्नीस मारहाण केल्याची घटना घडली .
माजलगांव तालुक्यातील रेणापूरी , फुले पिंपळगाव , शेलापुरी , ब्रम्हगाव , वडगाव आदी गावातील लोक नागपूर जिल्ह्यात उसतोडणीसाठी गेलेले असतांना गावाकडे येताना रस्त्यात अडकलेल्या लोकांना मागील आठवड्यात शासन निर्णयानंतर आणण्यात आले . २२ एप्रिल रोजी ५९लोकांना क्वारंटाईन करण्यात आले . यातील अनेकजण दारू पिण्यासाठी पोलिसांची नजर चुकवून १० फुटाच्या कंपाउंडवरून उडया मारून जात असल्याचे येथे असलेल्या आजुबाजुच्या नागरिकांनी सांगितले .
मिरा राजेश अनभुले रा . वडगाव या महिलेने केलेल्या तक्रारीनुसार , तिचा नवरा राजेश हा कंपाऊंडवरून उडया मारून दारू पिण्यासाठी जात होता . शनिवारी त्याने दारू पिऊन तिला मारहाण केली . याबाबत तिने तिच्या भावाला फोन करून झालेल्या घटनेची माहिती दिली . त्यानंतर तिच्या भावाने सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांना याबाबत माहिती दिली .
त्यानंतर सौंदरमल यांनी या ठिकाणी जावुन हकीकत जाणून घेतली व पुन्हा दारू पिऊन आल्यास महिलांना घेऊन येऊन चांगलाच चोप दिला जाईल , अशी समज दिली . त्यावर राजेश हातपाय जोडु लागला . दरम्यान पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी सदरील घटना शनिवारी झाली होती . दारू पिणाऱ्या व्यक्तीला समज देण्यात आला असुन यापुढे त्याने असा प्रकार केल्यास त्याला गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले आहे .

Comments (0)
Add Comment