शब्दराजचा दणका – बोगस नोकर भरती प्रकरणात अखेर गुन्हा दाखल

पुणे – परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अविनाश साखरे या व्यक्तीने प्रविण राऊत या व्यक्तीकडून 20 लाख रूपये घेवून नोकरीचे बनावट नियुक्ती आदेश दिल्याने त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मागील आठ दिवसांपासून शब्दराजने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील बोगस नोकर भरतीचे प्रकरण लावून धरले होते. सर्व काही सत्य असतानाही विद्यापीठ प्रशासन हे मान्य करायलाच तयार नव्हते. संबंधित व्यक्तीविरूध्द कारवाई व्हावी याकरिता शब्दराजने सातत्याने पाठपुरावा केला व अखेर त्याला यश आले. दरम्यान, या प्रकरणात कृषी विद्यापीठातील पुरभा कोंडिबा काळे यांनी शनिवारी (दि.पाच) सायंकाळी दिलेल्या तक्रारीच्या आधारे अविनाश साखरे यांच्या विरोधात भादंवि कलम 420, 468 व 471 या कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी विद्यापीठात 2014 साली कृषी सहाय्यक पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू होती. या पदभरती दरम्यान प्रवीण दगडू राऊत (रा. युसूफ वडगाव, ता. केज) यास 200 पैकी केवळ 30 गुण मिळाले होते. त्यामुळे तो उमेदवार परिक्षेत अनुत्तीर्ण झाला होता. गुणवत्तेनुसार तो अपात्र असतानासुध्दा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तत्कालीन कक्ष अधिकारी व सध्या बदनापूर कृषी महाविद्यालयात कार्यरत असलेले अविनाश बाळासाहेब साखरे यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता प्रवीण राऊत यांच्याकडून 20 लाख रुपये घेतले अन् विद्यापीठाच्या लेटरपॅडवर बनावट नियुक्तीचे आदेश व कागदपत्रे तयार करून ते बनावट आहेत, हे माहित असतानासुध्दा ते खरे म्हणून वापरून विद्यापीठासह राऊत यांची शुध्द फसवणूक केली. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी शब्दराजच्या वतीने करण्यात आली होती.
अखेर शब्दराजने केलेल्या पाठ पुराव्याला यश आले असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रतिमेला काळिमा फासणार्‍या अविनाश बाळासोब साखरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.आलेवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

vnmkv job scamबोगस नोकर भरती प्रकरणवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
Comments (2)
Add Comment