संसार… एक मायाजाल

मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।

जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥

चिरंजीव हे सर्वही मानिताती ।

अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥ 15 ॥

 

अर्थ: मृत्यू हे जगातील एकमेव सत्य आहे. किंवा जे जे सत्य म्हणजे खरे वाटते आहे ते ते मृत म्हणजे नाशिवंत आहे. सार्‍या नश्‍वर गोष्टी चिरंजीव म्हणजे चिरकाल टिकणार आहेत असे वाटून मन त्यात गुंतून पडते.

लक्षात असू दे अकस्मात म्हणजे तुम्हाला पूर्वसूचना न देता हे सारे ‘तुमचे’ (धनधान्य, संपत्ती, नातेवाईक) तुम्हाला सोडून जाणार आहे आणि त्या ही पेक्षा भयंकर की, तुम्हीच कोणत्याही क्षणी हे सारे इथेच सोडून जाणार आहात.

समर्थ म्हणतात की,

आपल्याला या सत्याचा नेहमी विसर पडतो आणि ‘मी’ या अहंकाराखाली आपण पूर्ण आयुष्य घालवतो. हे सारे माझे आहे अशा भ्रमात माणुस राहतो. अरे पण मुळात तू किती वेळासाठी आहेस हेच नक्की ठाऊक नाही ना.

मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगूळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपाची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, काखेस झोळी, अशा थाटात समर्थांची रुबाबदार आणि दुसर्‍यावर छाप पाडणारी मूर्ती संचार करीत असे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा॥ हा श्‍लोक वामन पंडितांनी समर्थ रामदासांना उद्देशून लिहिला आहे.

समर्थांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. भक्ती केल्यामुळे देव निश्‍चितपणे प्राप्त होतो असे त्यांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे. त्यांनी स्वतः 12 वर्षे नामस्मरण भक्ती केली व त्याचा प्रसार केला. परमार्थाशिवाय केलेला प्रपंच ’भिकारी’ आहे. ज्या घरामध्ये रामनाम नाही ते घर सोडून खुशाल अरण्यात निघून जावे असे समर्थ निक्षून सांगतात. देवाचे वैभव वाढवावे, नाना उत्सव करावे असे त्यांचे मत होते. समर्थांनी प्रत्ययाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानले. अनुभवाशिवाय असलेल्या केवळ शब्दज्ञानाची त्यांनी तिखट शब्दात हजेरी घेतली आहे. भोंदू गुरू व बावळट शिष्य हे परस्परांचे नुकसान करतात असे त्यांनी सांगितले आहे.

समर्थ रामदासस्वामी आपल्या या मनाच्या श्‍लोकामध्ये आपली स्वार्थी वागणुकीबद्दलचे सत्य विश्‍लेषण करून सांगतात. या चराचर सृष्टीमध्ये परमेश्‍वर सोडून प्रत्येक गोष्ट जन्माला येते आणि नाश ही पावते, जन्म आणि मृत्यू हे त्रिकाल सत्य आहे नि अटळ आहे. परंतु आपणास वाटते किंवा गैरसमज असतो कि आपण कधी मरणारच नाही, जन्माला आलोय तर मृत्यू हा येणारच हे विसरून गेलेलो असतो आपण, नि या संसार प्रपंचामध्ये गुंतत रहातो व अडकून जातो.

ध्यान करून ज्ञान मिळवता येते आणि ज्ञान नसेल तर माणूस अज्ञानी राहतो. आपण ह्या गोष्टी जरूर लक्षात घ्याव्यात की कोणत्या गोष्टी आपल्याला समोर घेऊन जातील आणि कोणत्या अडवून ठेवतील, म्हणून तेच निवडा जे तुम्हाला ज्ञानाकडे, ध्येयाकडे घेऊन जातील. -तथागत गौतम बुद्ध

या संसारमायेमध्ये कर्म करत असताना मनुष्य फळाची अपेक्षा धरून चालतो. अपेक्षा पूर्ण जरी झाली तरी त्यातून संतुष्टी मिळत नाही आणि अपेक्षा वाढतात पुन्हा त्या पूर्ण करण्यासाठी संसारमायेत फिरत बसतो.

मी किती कमवले पुढच्याने किती कमवले, माझे घर, माझी गाडी, माझे रान, ही स्वार्थी आणि मत्सरी वृत्ती ठेऊन जगत राहतो परंतु हे सर्व नाशिवंत आहे कधी ना कधी नष्ट होणार आहे असा विवेकाने विचार करायला हवा.

माणुस जन्माला येतो ते रित्या हाताने व मृत्यु पावला की सारे काही इथेच सोडावे लागते. मधले अंतर म्हणजे जीवन.

जन्म जसा झाला मोकळ्या हातानी तसंच मृत्यूनंतरही अवस्था असते. मृत्यूनंतर हे सर्व माझं माझं झालेलं संसाराचं ओझं इथेच ठेऊन जावे लागते, सोबत असते ते फक्त कर्माप्रमाणे कमावलेली पापपुण्याची कमाई.

म्हणून जन्मी आल्यानंतर उत्तम कर्म करीत सदवर्तनाने, भक्तीमार्गात जीवन व्यतीत करण्यातच मनुष्याची योग्यता आहे असे समर्थ रामदास स्वामी सांगतात.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
ज्योती कुलकर्णी, मुंबई

manache shlokजय जय रघुवीर समर्थ
Comments (0)
Add Comment