पुणे – परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात बोगस भरतीचे प्रकरण घडले. या प्रकरणाचे यथोचित वार्तांकन ’शब्दराज’ने केले. हे प्रकरण गुलदस्त्यातच ठेवण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून होत असताना शब्दराजच्या माध्यमातून त्याला वाचा फोडण्यात आली. परंतु विद्यापीठ प्रशासन याला जराही गांभीर्याने घेताना दिसत नाही. प्रकरण उघडकीस येवून एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधी झाल्यानंतरही विद्यापीठाकडून मात्र याविषयी ’ब्र’ शब्दही काढण्यात येत नाही. सर्व काही घडलेले असतानाही विद्यापीठ हे सत्य नाकारत आहे असेच वाटते. त्यामुळे सबकुछ गोलमाल, बोगस भरतीवाले मालामाल ? अशीच काहीशी अवस्था सध्या तरी आहे.
सदरील बनावट नोकरीचे ऑर्डर (जॉइनिंग लेटर) ते बनावट बदलीचे ऑर्डर (ट्रान्सफर ऑर्डर) प्रकरण अतिशय गंभीर असतानाही विद्यापीठ प्रशासन मात्र काहीच घडले नाही याच आविर्भावात दिसत नाही. आता विद्यापीठात सुरू असलेल्या या गैरकारभाराची सर्वत्र चर्चा होत आहे. विशेष म्हणजे मिळालेल्या माहितीनूसार सदरील प्रकरण हे मुख्य प्रशासकीय इमारतीतच घडल्याचे बोलले जात आहे. खरेच जर असे असेल तर मात्र ही फार मोठी दुर्देवी बाब आहे, कारण याच ठिकाणी मा. कुलगुरू व कुलसचिव यांची महत्वाची कार्यालये आहेत. या ठिकाणी राहून एवढे मोठे बोगस काम करण्याचे धाडस कोणी केले असेल ? या प्रकरणातील मुख्य मास्टर माइंड कोण ? हे सर्व कुण्या एका व्यक्तीने केले की यात अजूनही कोणी सामील आहे ? या प्रकरणात अजून कोणाचे हितसंबंध आहेत का ? हे सर्व करणार्याच्या मागे विद्यापीठातील कोणी व्यक्ती खंबीरपणे उभी आहे का ? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
विद्यापीठाने या प्रकरणात लपवालपवी व टाळाटाळ न करता सत्य जनतेसमोर आणण्याची गरज आहे. तरच विद्यापीठाची मलीन झालेली प्रतिमा उंचावेल अन्यथा विद्यापीठच गुन्हेगाराला साथ देते असा चुकीचा संदेश बाहेर जाईल.