सहज सुचलं

आज सकाळी कोकीळेच्या कुंजारवाने जाग आली….गळ्याभोवतीची तुझी मिठी सैल केली….उठलो…ब्रश केला…म्हंटल तुला सरप्राईज द्याव…तर तूच चहा घेऊन उभी…झोपेतनं उठलेले ते तुझे विस्कटलेले केस….कसली गोड दिसत होतीस…बघतच रहावस वाटल….मग तूच म्हणालीस…चला चहा घेऊयात…आणि तुझ्या हातचा तो आलं घालून केलेला वाफाळलेला चहा…..किती सुख असतं ना…आणि मग तू म्हणालीस चला आपण बगिच्यात जावू…आणि हातात हात धरून आपण बगिच्यात गेलो….आणि प्राजक्ताचा सडा पडलेला अंगणात… त्याचा दरवळ सर्व आसमंती पोहोचलेला….आणि मी तुझ्या ओंजळीत प्राजक्त घातला….त्याचा सुवास तू श्वासात भरुन घेतलास…मी मंत्रमुग्ध तुझ ते निखळ रुप बघण्यात मग्न…. विचार केला ह्याच्या आधी कितिदा बघितलय हिला पण आज काही वेगळच रुप भासतय हिच….मग विचार केला आपण का मुकतो अशा सुरेख क्षणांना… मग मीच भानावर आलो…ही मात्र प्राजक्ताच्या सुगंधात हरवली होती….मी तीच्या नकळत तिच्या खांद्याला स्पर्श केला…थोडीशी भांबावली….

मोहरली….हरकली….नकळत मिठीत विसावली… कोकीळेच कुंजारव सुरुच होत….आणि मला आठवून गेल….अविट गोडीच अस लता दिदिच गाणं….
सुनो सजना पपीहेने,कहा सबसे पुकारले के काय गम्मत असते ना गाण्यांची… काही गाणी तर ऐकताना असं वाटतात की फक्त आपल्यासाठीच आहेत….

आणि नंतर आपण घरात आलो…..पेपर आलेला होता ….माझ लक्ष तुझं लक्ष एकावेळेस पेपरवर गेलं…आणि तू उचलायच्या आत मी पेपर उचलला…. पहिल्यांदा पेपर वाचण्याच सुख आज मी अनुभवल…

आज सुट्टी होती आणि जेवतांना तू बनवलेला गरम गरम वरणभात आणि त्यावर साजूक तूप व वर लिंबू पिळलेल….काय चव वर्णावी त्याची…
अगदी आनंदाचे डोही आनंद तरंग

आणि मग दुपारची वामकुक्षी….. एखाद पुस्तक वाचावं म्हंटल तर तुझं ते लाडात येणं आणि आपण गाणी ऐकूया म्हणून मागे लागणं….दोघांची आवड सारखी…त्यामुळे जमायच …मग पुस्तक बाजूला आणि गाण्याची मैफील….
आशाताईंच जाईए आप कहा जाए हे गाणं तुझ्या आवडीचं….मग त्याचा नंबर आधी…. गाणं सुरु असतांना तुझ्या चेहऱ्यावरचे भाव बघतांना मी सुखावून जायचो…नंतर माझ्या आवडीच गाणं …बाबूजींची खुप गाणी आवडायची मला… त्यातल एक आवडिच गाणं म्हणजे…
धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
शब्दरुप आले मुक्या भावनांना

आणि मग परत तुझ्या हातचा तो आल्याचा वाफाळलेला चहा…आणि रात्री गाण्याचा कार्यक्रम…. कधिच चुकत नव्हता….आणि मग बाहेरच खावून यायचं अस ठरलेल होत…

आणि आज जगजीतसींग चा लाईव्ह बघायला जाणार होतो….दोघेही किती आनंदात हो…दहा वाजता कार्यक्रम सुरु होणार होता… इकडे धो धो पाऊस कोसळत होता…आणी आपण बरोबर नऊ वाजता घरातनं बाहेर पडलो…बाहेर पावभाजी खाल्ली आणि एव्हड्या पावसात तुला टेंडर कोकोनट आईस्क्रीम खायची ईच्छा झाली….खुप आईस्क्रीम पार्लर शोधली…तेव्हा कुठे एका ठिकाणी टेंडर कोकोनट मिळालं आणि तुझा जीव भांड्यात पडला….

आणि आपण हाँलवर पोहोचलो…हाँल खचाखच भरला होता….आणि जगजीतजी विराजलो…त्यांना प्रत्यक्षात बघून मनाला जो आनंद झाला…तो अवर्णनीय…. आणि जगजीतजींनी गायला सुरुवात केली…त्यांच्या गझल्स ऐकतांना अक्षरशः अंगावर शहारे येत होते….
होठो से छुलो तुम
तुमको देखा तो ए खयाल आया
झुकी झुकी सी नजर
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
होश वालो को खबर क्या

ह्या आणि अजून काही गझल्स त्यांनी गायल्या….आणि शेवटची गझल गायला घेतली तेव्हा पहाटेचे तिन वाजले होते….आणि गझल होती

कोई पास आया सवेरे सवेरे
मुझे आजमाया सवेरे सवेरे

अक्षरशः अंगावर रोमां दाटले होते…डोळ्यात अश्रू दाटले होते…आणि आपण दोघेही हातात हात पकडून मार्गस्थ झालो घराकडे….अजून काय सुख हवं असत माणसाला आयुष्यात…. आजचा दिवस सार्थकी लागला होता….
मग शोधायचं ना छोट्या छोट्या गोष्टीतन सुख

सौ.अलका माईणकर

मराठी लेखमराठी साहित्यसहज सुचलं
Comments (0)
Add Comment