देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी
मना सज्जना हेची क्रिया धरावी
मना चंदनाचेपरी त्वां झिजावे
परी अंतरी सज्जना नीववावे ॥8॥
अर्थ: मरण पावल्यानंतर आपली सुकीर्ती मागे उरायला हवी असेच वर्तन, हे सज्जन मना, नेहमी ठेवावे. तू चंदनासारखे झिजावेस आणि सज्जन लोकांना समाधान द्यावेस.
माणुस म्हणुन जन्म घेतल्यावर… जन्म व मृत्यु यातले अंतर म्हणजे जीवन… जे प्रत्येकाला स्वत:चे अस्तित्व व ओळख देत असते.
जन्माला आला, जगला, मेला. कुणाच्या आठवणीतही राहिला नाही असलं जीवन जगण्यात काय अर्थ? माणसानं असं जगलं पाहिजे की मेल्यानंतरदेखील त्याची सत्कीर्ति दिगंत पसरलेली रहावी. स्मारकातून, पुतळ्यातून नाही तर माणुस त्याच्या कर्तृत्वाच्या आठवणीतून मागे उरायला हवा. सज्जनहो, हे मनोमन समजून घ्या आणि तसं होण्यासाठीची वर्तणूक ठेवा.
जगात दोन प्रकारच्या वनस्पती आहेत.
एक – आपलं फळ स्वतः हुन देणार्या (उदा: आंबा, पेरु, केळी)
दुसरी – आपलं फळ लपवून ठेवणार्या (उदा. गाजर, मुळा, बटाटा, कांदा)
ज्या आपली फळे स्वतःहुन देतात,त्या आयुष्यभर पुन्हा पुन्हा फळं देत राहतात, त्यांना सर्वजण खत पाणी देऊन जीव लावतात. अन् ज्या आपलं फळ लपवून ठेवतात त्यांना मुळा सहित उपटून काढलं जातं.
तसेच जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वतःहुन समाजाच्या सेवेसाठी खर्च करतो. तो समाजात मान सन्मान मिळवण्यात यशस्वी ठरतो. त्याची चांगली किर्ती समाजात शिल्लक राहते. याउलट जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वार्थापोटी लपवून ठेवून दुस-यांना फसवितो. इतरांना देण्याची वृत्ती बाळगत नाही तो मुळासकट उपटला जातो.
सोन्याचे चार प्रकारे परीक्षण केले जाते ; उजळणे, तोडणे, गरम करणे आणि मारणे. त्याचप्रमाणे, माणसाला त्याग, गुण, वागणूक अणि आचरण हा चार गोष्टीवर परीक्षण केले जाते.
-असे चाणक्यनिती सांगते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मदर तेरेसा, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद आदी अनेक संत आणि समाजसेवकांनी आपले संपूर्ण जीवन जनतेच्या सेवेत खर्चले व माणुसकी जिवंत ठेवली.
आपण कितीही यशस्वी झालो व धन कमवुन मालमत्ता घेतली तरी आयुष्यात जिंकलेली मने, मिळवलेलं प्रेम, केलेली मदत ही खरी दौलत मरणानंतरसुद्धा जिवंतच राहते आणि यालाच आपण माणुसकीचा धर्म म्हणतो. आपले अहोभाग्य म्हणुन आपल्याला माणसाचे जीवन मिळाले आहे. तेव्हा या छोटयाशा जीवनात सगळ्यांबरोबर मिळून मिसळुन राहायला पाहिजे.
आपणही आपल्या आयुष्यात दुस-यांच्या जीवनासाठी, सुखासाठी, अधिकारासाठी मदत करू शकत असू तर आपण ते नक्कीच करायला हवे आणि हीच माणूस म्हणून आपली खरी माणुसकी आहे.
चंदन उगाळलं जात असताना घासून घासून झिजतं, पण उगाळणार्या हातालादेखील सुगंधित करून जातं. तसं तुम्ही मनानं असावं. जगात खरोखरीचे सज्जन, गुणीजन असतात त्यांना तुम्ही आपले आहात असे, प्रेमाचे, आदर करण्यासारखे वाटायला हवे असे वर्तन ठेवा, त्यांना आनंद, समाधान द्या.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
ज्योती कुलकर्णी, मुंबई