निफाड,दि 21 (प्रतिनिधी)ः
यावर्षी सोयाबीन पिकाचे दर सात ते आठ हजार रुपयांपर्यंत पोहचले असल्याने सोयाबीन बियाण्यांच्या किंमती वाढण्याच्या शक्यता आहेत. हे गृहीत धरून शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरणी करण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता तपासावी अन मगच पेरणी करावी असा सल्ला कृषी सहाय्यक वंदना आघाव यांनी गोंदेगाव येथील शेतकऱ्यांना दिला आहे.
सोयाबीन पीक हे स्व पराग सिंचित पीक आहे. प्रत्येक वर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. एकदा बियाणे वापरले की त्याच्या उत्पादनातून तयार होणारे बियाणे दोन वर्षे वापरता येते.त्यात, या हंगामात शेतकऱ्यांना खराब प्रतीचे बियाणे मिळाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. यातून फसवणूक देखील झालेली होती. या बाबत पंचनामे देखील केले होते. तसेच, यावर्षी सोयाबीनच्या दराने उच्चांक गाठला असल्याने सोयाबीन बियाणेच्या किंमती वाढण्याच्या शक्यता असल्याने घरगुती बियाणे वापरावे.त्यामुळे, शेतकऱ्यांचा मोलाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असल्याचे आघाव यांनी सांगितले.
अशी तपासा उगवण क्षमता
उपलब्ध घरगुती सोयाबीन बियाण्यांमधून शंभर सोयाबीनचे दाणे घ्यावे. बारदान गोणीवर ते दहा बाय दहाच्या अंतराने ते ठेवावे. त्या बारदानावर पाणी शिंपडून चिळबिळीत ओले करावे.त्यानंतर बारदानाची गुंडाळी करून त्याचे दोन्ही टोके बांधून थंडावा असलेल्या जागेत पाच – सहा दिवस ठेवावे. या कालावधीत त्या बारदानावर दिवसातून दोन – तीन वेळा पाणी शिंपडावे.बारदान कोरडे होणार नाही याची दक्षता घ्यावी. पाच – दिवसांचा कालावधी पूर्ण झाला की ती गुंडाळी उघडावी. शंभर बियाण्यांपैकी किती बियाण्यांना कोंब आले आहेत ते बघणे. कोंब आलेल्या बियाण्याची संख्या म्हणजे त्याची उगवण क्षमतेची टक्केवारी असते.