आज जग सुधारले. जणूकाही आपल्या मुठीत आले. पूर्वीच्या काळी कबूतर किंवा हरारके संदेश देण्यासाठी पाठवले जात. पण इंग्रजांनी टपाल खाते सुरू केले नि पोस्ट व्यवस्थेमधून पत्र, संदेश किंवा मनीऑर्डर जाऊ लागली. त्यासाठी आठ दिवसाचा कालावधी लागे परंतू कम्प्युटर नि मोबाईलचा शोध लागला आणि सातासमुद्रापार असलेले जग हाकेच्या अंतरावर आले. घरात बसून वेबकॅम द्वारा कोणत्याही देशातील व्यक्तीशी समोर बसून बोलणे होवू लागले. पैसे पाठवणे, तिकीट आरक्षण ,लाईट, फोन बिल भरणे, मनीऑर्डर करणे या गोष्टींना रांग न लावता चुटकीसरशी कामे होऊ लागली. लोकांचा वेळ वाचू लागला. कार्यालयातील कामांनाही वेग आला आणि आठ दिवसाचे काम काही तासांत होऊ लागले. कार्यालयातील व्यक्ती या यंत्रावर अवलंबून राहू लागल्या आणि पाहता पाहता आपण त्याच्या कधी आधीनही झालो हे आपल्या लक्षातही आले नाही.
पूर्वी पत्र लिहायला बसले की घरातील सानथोर सगळे मिळून पत्र लिहिणाऱ्या जवळ बसत नि आपले संदेश पत्र लिहिणार्याला सांगत असत. त्यातून समोरच्याविषयीचा जिव्हाळा व्यक्त होई.आता फोनवर बोलू शकत असल्याने पत्र लिहिणे तर दूरच पण भेटण्याची ओढच कमी झाली आहे. सर्व गोष्टी हाकेच्या अंतरावर आल्याने भेटायला जाऊ शकतो.पूर्वी गावाहून मुंबईला एखादी व्यक्ती येत असेल तर तिला घरातील पाच सहा सदस्य घालवायला येत व गाडी चालू होईपर्यंत सुचेना देत असत तसेच “पोहोचल्यावर पत्र टाक बाबा” अशा प्रेमळ सूचना मिळत असत. आज तो जिव्हाळा राहिला नाही नि ती माणसंही दुरावलीत.
पूर्वी शहर आणि गाव यात खूप तफावत असायची. आता दोन्ही सारखेच वाटतात त्यामुळे पूर्वी खरेदीला, बाजारला लोकं शहरात किंवा तालुक्याच्या गावी जायची, तसे राहिले नाही. सर्वजण एकत्र खरेदी करण्याचे प्रमाण घटले आहे. ‘तू तुझे नि मी माझे’ अशी आपपरवृत्ती वाढली आहे. गावांचे शहरीकरण झाल्याने पूर्वीचा मामाचा गाव आता इतिहासजमा झाला आहे. बैलगाडीने प्रवास करणे नि नारळाची वाडी यांचे अप्रूप वाटत नाही. पूर्वी एकमेकाच्या नादाने विहिरीत, नदीत पोहायला जाण्यात जी मजा होती किंवा गावाला जाण्याची जी ओढ होती ती राहिली नाही. संध्याकाळी सर्व नातवंडे आजीभोवती कोंडाळे करून गोष्ट सांगायला सांगायची.आता आजीसह नातवंडे ही टूकार मालिका पाहत बसतात किंवा हातात मोबाईल घेवून गेम खेळत बसतात. मोबाईलचे व्यसन इतके वाढले आहे की लहान वयातच मुलांना प्रौढत्व प्राप्त झाले आहे. मैदाने ओसाड पडली आहेत. एकेकाळी गजबजाट असणारी मैदाने आज कोपरे धरून बसणाऱ्या कॉलेज किंवा वृद्ध लोकांनी व्यापलेली दिसतात तेही मोबाइलमध्ये डोके खुपसून बसलेली असतात.
आज एकमेकांना मदत करण्याची वृत्तीही राहिली नाही. एखादा वाईट प्रसंग, अपघात किंवा खुन असेल तर त्या लोकांना मदत करायची सोडून व्हिडिओ चित्रीकरण करण्यात धन्यता मानतात. सोशल मीडियाचा वापर अमर्याद झाल्याने लहान वयातच मुलांचे अतिवजन, डोकेदुखी नि चष्मा लागणे अशा संकटांना सामोरे जावे लागते. मुलांची खेळण्याची वृत्ती कमी झाल्याने या आजारांना बळी पडताहेत. मोबाईलसाठी आत्महत्या किंवा मारामारी असे प्रकार पाहायला मिळतात. मोबाईल हातात असणे स्टेटस सिम्बॉल झाले आहे. सोशल मीडियाचा गैरवापर असाच वाढत गेला तर जीवनातील खऱ्या आनंदाला माणूस मूकणार आहे आणि रसातळाला जाणार आहे. गप्पा मारणे जवळजवळ बंद झाले आहे .त्यामुळे वैचारिक देवाण-घेवाण होत नाही. तेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा पण मर्यादित ठेवावे
वेळीच आवर घातला नाही तर भारताची संस्कृती नामषेश होवून तिचे अमेरिका झालेले चित्र दिसेल.
सौ.भारती सावंत
मुंबई
फोन 9653445835