आळंदी देवाची, प्रतिनिधी – सद्गुरू वै. ह. भ. प. रामदास बाबा कबीर महाराज यांचा अमृतमहोत्सवी पुण्यस्मरण सोहोळा ,श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे दि.१३ मे ते १९मे २०२० दरम्यान अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या संजीवन समाधी मंदिरा लगत सन १७६५ मध्ये स्थापन झालेल्या श्री संत कबीर महाराज मठाच्या परंपरेतील ४ थे सत्पुरुष सद्गुरू रामदास बाबा होत. संत कबीर साहेबांची काशी येथून आलेली परंपरा संत ज्ञानदेवांच्या चरणाशी या मठाद्वारे समर्पित झाली. या मठाचा भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय उत्थानामध्ये मोलाचे मार्गदर्शन, आशीर्वाद आणि सहभाग राहिला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना सुध्दा या मठाचे मार्गदर्शन व प्रेरणा प्राप्त झाली. सद्गुरू रामदास बाबा यांचे थोरले बंधू सद्गुरू वै. ह. भ. प.श्री एकनाथ बाबा कबीर महाराज यांनी ,बडोदा येथे वास्तव्य करून महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे राजगुरू म्हणून मार्गदर्शन केले.
महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाची स्थापनेची बीजे आणि प्रेरणा ही याच मठामधून प्राप्त झाली. सद्गुरू रामदास बाबांनी आपली परंपरा आणि तिचा विस्तार मुंबई आणि परिसरातही केला. महाराष्ट्रातील समग्र कोळी आणि आगरी समाजाला वारकरी संप्रदायात अनुग्रहित करून घेतले .१०० वर्षांपूर्वी मुंबई यथीेल वरळी कोळीवाड्यात नाम सप्ताह चालू केला. महाराणी ताराराणी आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात ज्या देवीच्या समोर तह झाला, त्या आदिशक्ती कमलजा माता, कळंब ता.आंबेगाव ,जिल्हा पुणे येथे ११२ वर्षांपूर्वी नाम सप्ताह चालू केला. असे विविध ठिकाणी उत्सव चालू करून सामाजिक अभ्युदयाची चळवळ सुरू केली. हे सर्व कार्यक्रम आजही १००वर्षानंतर याच मठाच्या परंपरेने सुरू आहेत. सद्गुरू जोग महाराज,सद्गुरू मारुती बुवा गुरव महाराज यांना सहकार्य करून वारकरी शिक्षण संस्थेच्या उभारणीत मोलाचे सहकार्य केले.हीच प्रेरणा आणि मार्गदर्शन सद्गुरू बाबांच्या पुढील पिढीला प्राप्त झाली. थोरले सुपुत्र वै. ह. भ. प. श्री पंढरीनाथ कबीर महाराज यांनी सामाजिक व राजकीय चळवळीत, स्वातंत्र्य पूर्व काळात सहभाग घेतला.आळंदी देवाची नगरपरिषदेचे सलग २५ वर्षे नगराध्यक्ष राहिले. तदनंतर १९५२ च्या पहिल्या विधानसभेत खेड आळंदी आमदार म्हणून सेवा केली. तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना करून ,पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे विणले. तसेच आळंदी क्षेत्री श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाची स्थापना केली व त्याचे अध्यक्षपदही भूषविले.सद्गुरू बाबांचे दुसरे सुपुत्र वेद शास्त्र संपन्न वै. ह. भ. प. श्री तुकाराम कबीर महाराज यांनी काशी क्षेत्री कबीर कीर्ती मंदिरात १२ वर्ष अध्ययन करून, संपूर्ण देशात वारकरी परंपरा प्रस्थापित करण्याचे अलौकिक कार्य केले. देशातील अग्रणी विद्वान म्हणून त्यांना मान्यता होती. हीच गोष्ट परंपरा पुढे वै. ह. भ. प.श्री केशव महाराज कबीर यांनी सांभाळली. त्यांनी आळंदी नगरपरिषदेचे अध्यक्ष पदही भूषविले.वारकरी संप्रदायाचे नेतृत्व केले.वारकरी महामंडळाची स्थापना श्री संत कबीर महाराज मठ, आळंदी देवाची येथे करून, वै. हभप तुकाराम महाराज कबीर महाराज यांचे शिष्य वै. बाबासाहेब वरळीकर, महापौर ,मुंबई यांना अध्यक्षपद स्वीकारायला लावले. संत ज्ञानदेवांच्या संजीवन समाधी सप्तशताब्दी, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन सोहोळा, मुक्ताई ज्ञान ज्योत यात्रा, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी विजयात्रा या कार्यक्रमाचे नेतृत्व केले.महाराष्ट्रातील सर्व पालख्यांचा महासंघ स्थापन करून अध्यक्षपद भूषविले.
सद्गुरू श्री रामदास बाबा कबीर महाराज यांचा अमृतमहोत्सवी पुण्य स्मरण उत्सव कोरोना संकटामुळे सर्व सोशल डिस्टिटिंग चे नियम पाळून श्री संत कबीर महाराज मठामध्ये साजरा करण्यात आला. बाबांचे पणतू, हभप अनंत महाराज, हभप चैतन्य महाराज कबिरबुवा, हभप वेद महाराज यांनी संपन्न केला. दररोज सायंकाळी ५ वाजता हभप चैतन्य महाराज कबिरबुवा यांनी संत परंपरा व लोकोत्तर कार्य या विषयावर ७ दिवस प्रवचने केली. पुण्य स्मरण दिनी सायंकाळी ६ वाजता शांतीब्रह्म हभप मारोती महाराज कुऱ्हेकर यांची हरिकीर्तन सेवा झाली. समारोप अभंग भजन व काल्याने झाली. अभंग गायन श्री आबा महाराज गोडसे, हभप पंडित महाराज क्षीरसागर, हभप भोंडोकार महाराज, हभप विठ्ठल महाराज गव्हाणे उपस्थित होते.सोशल मीडियावर वर हे सर्व कार्यक्रम प्रसारित करण्यात आले. हा कार्यक्रम जगभरातील हजारो भक्तांनी पाहिला.या साठी हभप एकनाथ महाराज कोष्टी व हभप गंभीर महाराज अवचार यांनी सहकार्य केले. या सर्व उत्सवाचे संयोजन हभप संजय महाराज घुंडरे पाटील यांनी केले.