ऑल इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 1 जानेवारी 2025 रोजी 99.5 टक्के शुद्ध सोनं 79,390 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकलं जात होतं. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या दरात तब्बल 18,710 रुपयांची म्हणजेच सुमारे 23.56 टक्क्यांची वाढ झाली आहे. सोन्याच्या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय कारणंही महत्त्वाची आहेत. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव, तसेच मध्यपूर्वेतील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्याकडे कल केला आहे. जागतिक स्तरावर सुरक्षित गुंतवणूक मानलं जाणारं सोनं त्यामुळे मागणीच्या शिखरावर आहे.
भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा वेळी सोन्याच्या वाढत्या दरांमुळे ग्राहक संभ्रमात आहेत. अनेक स्थानिक सोनारांनी सांगितलं की, दररोज 50–100 रुपयांची वाढ सामान्य मानली जाते. पण एकाच दिवसात 1,000 रुपयांहून अधिक वाढ झाली, की ग्राहक मागे सरतात. विशेष म्हणजे, 11 एप्रिल रोजीही सोन्याच्या दरात एकाच दिवशी 6,250 रुपयांची उसळी पाहायला मिळाली होती. सध्या 99.5 टक्के शुद्ध सोनं सुमारे 98000 रुपयांना विकलं जात आहे. गुंतवणूकदारांसाठी ही सकारात्मक संधी असली, तरी लग्नकार्य किंवा पारंपरिक कारणांनी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही दरवाढ डोकेदुखी ठरत आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दर GST सह आहेत. GST वगळून MCX वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे दर 95 हजार 537 रुपये तोळा आहेत. तर 995 शुद्ध सोन्याचे दर 94 हजार ९०० रुपयांवर पोहोचले आहेत. 22 कॅरेट सोन्याचे दर 87 हजार 578 रुपयांवर आहेत. तर 18 कॅरेट सोन्याचे दर 71646 रुपयांवर पोहोचले आहेत. सराफ बाजारात या दरांसोबत GST, सर्विस चार्ज, मेकिंग चार्जेस देखील जोडले जातात. त्यामुळे यावरील दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. अक्षय्य तृतीयेआधीच सोन्याचे दर पुन्हा 1 लाखाचा टप्पा पार करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.