धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात महाघोटाळा केला असून त्यांनी मंत्रिमंडळात जो निर्णय झालाच नाही त्याचा आदेश काढून 200 कोटींचा निधी जारी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. जो निर्णय झालाच नाही त्याचा खोटा आदेश त्यांनी काढला आणि नंतर अतिरिक्त 500 कोटींची मागणी केल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही असंही त्या म्हणाल्या.
देशमुख हत्या प्रकरणात अपेक्षित कारवाई होत नाही. तसेच धनंजय मुंडे यांनी मागील सरकारच्या काळात कृषि खाते सांभाळले, त्यात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. अगदी मंत्रिमंडळ निर्णय झाला असे सांगून विना तारखेच्या पत्रांवर सह्या केल्या, आदेश निर्गमित केले, अशा मंत्र्याला खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही, असे अंजली दमानिया म्हणाल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज बनल्यानंतर आणि कृषि खात्यातील कथित घोटाळे बाहेर काढल्यानंतर धनंजय मुंडे यांचे नवे प्रकरण दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन बाहेर काढले.
जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही तर….
धनंजय मुंडे यांचे इतके सारे घोटाळे बाहेर काढूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नसतील तर यांच्यातच संगनमत आहे आणि म्हणूनच ते कारवाई करीत नाही, असे आम्ही समजू, असा इशारा दमानिया यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दिला.
तारीख नसलेल्या पत्रावर सह्या ते न झालेल्या कॅबिनेट निर्णयाचा आदेश
महाराष्ट्र शासन कार्य नियमावलीनुसार मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्णयानुसार तातडीने कारवाई करावी, असे धनंजय मुंडे सहीनुसार सांगतात पण संबंधित पत्रावर तारीखच नसते. याचाच अर्थ तारीख नसलेल्या पत्रावर धनंजय मुंडे सही करतात परंतु मंत्रिमंडळाने निर्णयच घेतलेला नाहीये मग कारवाई कशी करणार? म्हणजेच मंत्रिमंडळ निर्णय झाला असे भासविण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला. म्हणजे धनंजय मुंडे कुठल्या थराला गेले आहेत, असा थेट हल्ला करीत धनंजय मुंडे यांच्यावर दमानिया यांनी चढवला.
खोटे आदेश काढले
अंजली दमानिया म्हणाल्या की, “23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरच्या कॅबिनेटचे काही निर्णय झाले. पण यात कृषी विभागाशी संबंधित न झालेल्या निर्णयांबाबत धनंजय मुंडेंनी आदेश काढला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 200 कोटींच्या निधीचा कुठेही उल्लेख नसताना ती रक्कम आजच अदा करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी पत्रातून केले. याशिवाय ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त 500 कोटींच निधी देण्याची मागणी केली.धनंजय मुंडेंसारखा भ्रष्ट माणूस कृषी काय, कुठलाच मंत्री होण्याच्या लायक नाही.”
जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत संतोष देशमुख प्रकरणात अपेक्षित कारवाई होणार नाही असं दमानिया म्हणाल्या.