आचारसंहिता लागण्यापूर्वी ४४ लाख शेतकऱ्यांना शून्य वीजबिल मिळेल-उपमुख्यमंत्री अजित पवार

'संविधान वाचवू शकणारा जर कोणी असेल तर ते अजित पवारच आहे'-प्रफुल्ल पटेल

 

शब्दराज मीडिया – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघात पोहोचली असून, या जनसंपर्क कार्यक्रमाला परिसरातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासमवेत अजित पवार यांनी या भागात मोठ्या संख्येने उपस्थितांना संबोधित केले आणि या भागातील विकासकामांची माहिती दिली. गेल्या तीन वर्षांत आम्ही या भागाच्या विकासासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही आम्हाला पाठिंबा दिल्यास मी पुढील पाच वर्षांत पाच हजार कोटींची हमी देईल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. तुमसर येथे २०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारले असून, या भागात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते बांधणीसाठी २२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.तसेच क्रीडा संकुलचा विकास देखील करण्यात आला आहे. असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

 

 

आचारसंहिता लागण्यापूर्वी येत्या दहा दिवसांत ४४ लाख शेतकऱ्यांना शून्य वीजबिल मिळेल, असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला. भात उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये नुकसान भरपाई देणार असून, पुन्हा सत्तेत आल्यास त्यात वाढ केली जाईल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आम्ही महत्त्वाकांक्षी जलपर्यटन प्रकल्प विकसित करीत आहोत, ज्यामुळे भंडारा जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल, त्याचे पर्यटनस्थळात रूपांतर होईल आणि रोजगार निर्मिती होईल, असेही ते म्हणाले. गोसीखुर्द प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी १०१ कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादी आणि महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आम्ही जिंकलो तर तुमच्या विकासासाठी अधिक निधी देऊ, असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

 

 

यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, संविधानाला कोणी वाचवू शकत असेल तर ते अजित पवार आहेत. राष्ट्रवादी हा सर्वांचा पक्ष असून, या भागातील जनतेसाठी काम करण्याची क्षमता अन्य कोणाकडेही नाही, असे ते म्हणाले. सामाजिक फूट पाडणाऱ्या आणि सलोखा बिघडवणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. माझी लाडकी बहिण योजनेबद्दल बोलताना पटेल म्हणाले की, सुमारे सव्वा दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारच्या उपक्रमांविषयी बोलताना ते म्हणाले की, या भागात १०० टक्के सिंचन करण्याचे उद्दिष्ट आहे.

Comments (0)
Add Comment