मिरची (mirchi) ही आपल्या रोजच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर ते एक उत्तम व्यापरी पीक आहे. गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्व घरातील लोकांचे मिरची शिवाय चालत नाही. बाजरात हिरव्या व वाळलेल्या लाल मिरचीस वर्षभर मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मिरचीच लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्यातून कमी अधिक प्रमाणात केली जाते.
पण देशातील एकूण क्षेत्रापैकी 70% क्षेत्र आणि 75% उत्पादन आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या चार राज्यात केंद्रित झाले आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मिरची पिकाची लागवड केली जाते.
महाराष्ट्रात मिणचीचे अनेक स्थानिक प्रकार आढळतात. उदा. लवंगी, संकेश्वरी (कोल्हापूर), वाल्हा (पुणे), मुसळवाडी (अहमदनगर), देगलूर, धमीबादी (नांदेड), दोंडाईचा (धुळे), मलकापूरी (बुलढाणा), भिवापूरी (नागपूर) इत्यादी.
पहिला प्रकार म्हरजे तिखट, मसाल्यासाठी वापरण्यात येणार्या जाती. या लांब, तिखट, हिरवी किंवा वाळलेली मिरची म्हणून उपयोगात आणतात. या प्रकारामध्ये संकेश्वरी, पुसा ज्वाला, एन.पी.46, पंत सी – 1, फुले ज्योती यांचा समावेश होता. दुसरा प्रकार म्हणजे भाजीसाठी वापरण्यात येणारी ढोबळी मिरची उदा. कॅलिफोर्निया वंडर, यलो वंडर इत्यादी.
मिरचीमध्ये अ आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत. तसेच फॉस्फरस आणि चुना यांचे प्रमाणही चांगले आहे. मिरचीमध्ये ढोबळी किंवा भाजीच्या मिरचीपेक्षा तिखटपणा जास्त असतो. तिखटपणा हा कॅप्सिसीन द्रव्यामुळे तर लाल रंग कॅप्सिस्थिन या रंगकणामुळे येतो. मिरचीचा उपयोग मसल्यामध्ये, भाजी, आमटी, लोणचे इ. पदार्थातून चवीसाठी केला जातो.
सुधारीत जाती : मिरची (chilli) पिकामध्ये अनेक नवनवीन सुधारीत वाण विकसीत केले आहेत. फळांच्या आकारामध्ये खूप विविधता आढळून येते. फळांची लांबी 1 सें.मी. पासून 15 ते 20 सें.मी. असू शकते.
मिरचीच्या प्रामुख्याने पुसा ज्वाला, एन.पी. 46, पंच सी – 1, संकेश्वरी – 32, सिंधूर, जवाहर – 218, कल्याणपूर – 1, जयंती, सुरक्ता, परभणी तेजस, कोकण किर्ती, इत्यादी जाती विकसित केल्या आहेत. महत्मा फुले कृषि विद्यापीठाने मिरचीच्या मुसळवाडी सिलेक्शन, अग्निरेखा, फुले सई, फुले ज्योती, फुले मुक्ता, फुले सूर्यमुखी या जाती विकसित केल्या आहेत. या जाती उत्पन्नास तसेच गुणवत्तेस चांगल्या आहेत.
मिरचीचा तिखटपणा, आकार आणि उपयोग यावरून अनेक प्रकार आहेत. असे प्रकार किंवा जाती त्या त्या विभागात सर्रास वापरल्या जातात. मिरचीची जात निवडताना प्रामुख्याने भरपूर उत्पादन, चांगली गुणवत्ता, चांगला आकार व चांगली लांबी, गर्द हिरवा किंवा फिक्कट हिरवा रंग, लाल मिरचीसाठी गर्द लाल रंग व किडीस प्रतिकारक्षम, तिखटपणा व चांगला बाजारभावा मिळणे या महत्त्वाच्या बाबींचा विचार करून शेतकरी बंधूनी योग्य त्या जातीची निवड करावी.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने (mahatma phule krushi viyapeeth) विकसित केलेल्या काही जातीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :
1) अग्निरेखा : या जातीची सन 1992 मध्ये लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. ही जात दोडांईचा आणि ज्वाला यांचा संकरातून निवड पद्धतीने तयार केली आहे. या जातीची जाडे मध्यम उंचीची असतात. उन्हाळी आणि खरीप हंगामात लागवडीसाठी उपयुक्त अशी जात आहे. तसेच हिरव्या फळासाठी लागवडीची शिफारस करण्यात आली आहे.
वाळलेल्या लाल मिरचीचा उतारा कमी मिळतो. फळाची लांबी 10 ते 12 सें.मी. असून जाडी 0.8 ते 1.0 सें.मी. आहे. पिकलेल्या मिरचीचा रंग लालभडक आहे. हिरव्या मिरचीचा रंग पोपटी रंगा आहे. हिरव्या मिरचीचे 100 ते 120 क्विंटल उत्पन्न मिळते आणि वाळलेल्या मिरचीचे हेक्टरी उत्पन्न 20 ते 25 क्विंटल मिळते. भूरी आणि मर रोगाला सहजासहजी बळी पडत नाही. या जातीच्या फळांना स्थानिक व शहरी बाजारपेठेत चांगला बाजारभाव मिळतो.
2) फुले ज्योती : ही जात 1995 साली निवड पद्धतीने विकसित केली आहे. या जातीची झाडे मध्यम उंचीची आणि परसरणारी असतात. जमिनीपासून 3-4 फांद्या फुटतात. पाने हिरवी आणि आकाराने मोठी असतात. फळे घोसात लागतात आणि एका घोसात सरासरी 4-5 फळे असतात.
सर्व फळे एकसारखी वाढतात आणि एकाचवेळी काढणीस तयार होतात. फळांची लांबी 6 ते 7 सें.मी. असते तर जाडी 0.8 ते 1.0 सें.मी. असते. फळांचा रंग गर्द हिरवा असून पिकल्यानंतर लाल होतो. वाळलेल्या मिरचीचा रंग गर्द लाल असून तो चांगला टिकतो. रोपाच्या लागवडीनंतर 55 ते 60 दिवसात हिरव्या मिरचीचा तोडा मिळतो.
तर पिकलेल्या मिरचीचा पहिला तोडा 80 ते 90 दिवसात मिळतो. हिरव्या मिरचीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 180 ते 225 क्विंटल मिळते. ही जात भुरी रोगाला बळी पडते. तर फुले किडे आणि पांढरी माशी या किडींना चांगल्याप्रकारे प्रतिकार करते. पश्चिम महाराष्ट्रात खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे.
3) फुले सई : ही जात विद्यापीठ अंतर्गत कृषि संशोधन केंद्र, गडहिंग्लज येथून 1996 साली विकसित केली असून या जातीची पश्चिम महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. ही जात पंत सी – 1 आणि कमंडलू या दोन वाणाच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केली आहे.
या जातीच्या मिरच्या गर्द हिरव्या रंगाच्या असून वाळलेल्या मिरचीचा रंग लाल असतो. फळे 7 ते 8 सें.मी. लांब असतात. झाडे मध्यम उंचीची असतात. कोरडवाहू क्षेत्रात 13 ते 16 क्विंटल प्रति हेक्टरी वाळलेल्या मिरचीचे उत्पादन येते.
जमीन आणि हवामान : मध्यम ते काळी आणि पाण्याच्या उत्तम निचरा होणारी जमीन मिरची पिकास योग्य असते. हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात खत घातल्यास चांगले पीक येऊ शकते.
साधारणपणे 75 सें.मी. पाऊसमान असलेल्या भागात ओल धरून ठेवणार्या काळ्या कसदार जमिनीत कोरडवाहू मिरचीचे पीक चांगले येऊ शकते. जमिनीची नांगरट करून कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. जाती परत्वे अंतर ठेवून सरी वरंबे तयार करून बांधून घ्यावेत.
उष्ण व दमट हवामानात मिरची पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही हंगामात करता येते.
परंतु हिवाळी हंगामात 20 ते 25 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असल्यामुळे मिरची पिकाची वाढ चांगली होत नाही आणि त्यामुळे फूल धारणा व फळधारणा कमी प्रमाणात होते. त्यासाठी 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले असते. हंगामात तापमान 35 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक गेल्यास फुलांची गळ होऊन उत्पन्नात घट येते.
लागवडीचा हंगाम : मिरची हे पीक खरीप आणि उन्हाळी हंगामात घेतात. खरीप हंगामामध्ये बियांची पेरणी मे महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यापासून जून अखेरपर्यंत करतात. तर उन्हाळी हंगामासाठी जानेवारी-फेब्रुवारी मध्ये बियाणांची पेरणी करतात.
बियाणाचे प्रमाण : मिरचीच्या योग्य जातीची निवड केल्यानंतर रोपे तयार करण्यासाठी चांगली उगवणक्षमता असलेले, उत्कृष्ट दर्जाचे, अत्यंत खात्रीशीर बियाणे खरेदी करावे. साधारणपणे हेक्टरी 1.0 ते 1.25 किलो बी पुरेसे होते.
बियाणांची पेरणी करण्यापूर्वी प्रति किलो बियणास 2 ते 3 ग्रॅम थायरम चोळावे. रोपवाटिका तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करावेत. बियाणांची पेरणी केल्यापासून 4 ते 6 आठवड्यांनी आणि 15 ते 20 सें.मी. वाढली की रोपांची लागवड करावी.
रोपवाटिका : मिरचीच्या लागवडीचे यश चांगल्या जोमदार रोपावर अवलंबून असते. रोपे तयार करण्यासाठी 3-2 मी. लांबी रुंदीचे आणि 20 सें.मी. उंचीचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक गादी वाफ्यावर चांगले कुजलेले 2 घमेले शेणखत, 30 ते 40 ग्रॅम डायथेन एम -45 मिसळून बुरशीनाशक तसेच फोरेट 10 टक्के दाणेदार किटकनाशक 15 ग्रॅम प्रत्येक वाफ्यावर टाकावे आणि मिसळून घ्यावे. वाफ्याच्या रुंदीला समांतर दर 10 से.ंमी. अंतरावर खुरप्याने 2 ते 3 सें.मी. खोल ओळी कराव्यात.
या ओळीत बियाणांची पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकावे आणि हलके पाणी द्यावे. उगवण झाल्यावर 5 ते 6 दिवसांनी रोपवाटिकेस पाणी द्यावे. बी पेरल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी रोपांच्या वाढीसाठी प्रत्येक वाफ्यात 50 ग्रॅम युरिया द्यावा. परंतु जास्त प्रमाणात युरिया खताचा वापर टाळावा. त्यामुळे रोप उंच वाढतात आणि लुसलुसीत राहतात. त्यामुळे रोपांची लागवड केल्यानंतर रोप मरण्याचे प्रमाण वाढते.
त्यामुळे योग्य प्रमाणात वापर फायद्याचे ठरते. सर्वसाधारणपणे बियाणांची पेरणी केल्यापासून 40 ते 45 दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात. रोपवाटीकेत रोपे निरोगी ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी रोप उगवून आल्यापासून 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्यास 25 ते 30 ग्रॅम थिमेट किंवा फोरेट हे औषध दोन ओळीच्या मधून द्यावे.
रोपे 3 ते 4 आठवड्यांनी असताना एन्डोसल्फान 35 ईसी 15 मि.ली. आणि डायथेन एम – 45 (20 ते 25 ग्रॅम) 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे फुलकिडे, तुडतुडे आणि कोळी यांचे नियंत्रण होऊन बोकड्या (पर्णगुच्छ) या रोगापासून संरक्षण होते.
रोपांची लागवड : मिरची पिकाची लागवड सरी वरंब्यावर करतात. उंच आणि पसरट वाढणार्या जातीची / वाणांची लागवड 75 बाय 60 किंवा 60 बाय 60 सें.मी. अंतरावर तर बुटक्या जातीची लागवड 60 बाय 45 सेंमी. अंतरावर करावी. काळ्या कसदार भारी जमिनीमध्ये लागवडीचे अंतर जास्त ठेवावे.
उन्हाळी हंगामातील मिरची पिकाची लागवड फेब्रुवारी – मार्च महिन्यात करावी तर खरीप हंगामातील मिरचीची लागवड जून – जुलैमध्ये करावी. लागवडीपूर्वी एक दिवस अगोदर रोपवाटीकेस हलके पाणी द्यावे त्यामुळे रोपांची काढणी सुलभ होते आणि रोपांची मुळे तुटत नाहीत.
तसेच रोपांची लागवड करताना जास्त लांब असलेली मुळे खुरप्याने तोडावीत किंवा जास्त उंचीची रोपे असल्यास रोपाचा शेंडा कट करून लागवडीसाठी वापरावीत. त्याचप्रमाणे लागवडीपूर्वी रोपे विशेषत: पानाचा भाग पाच मिनिटे 10 ग्रॅम कुरॉक्रॉन + 25 ग्रॅम, डायथेन एम 45 + 30 ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक 10 लिटर पाण्यात मिसळावे आणि या मिश्रणात रोपे बुडवून काढावीत आणि लागवड करावी.
रोपांची लागवड शक्यतो सायंकाळच्या वेळी करावी. लागवडीनंतर तिसर्या दिवशी अंबवणीचे पाणी द्यावे. त्यामुळे रोपांची मर कमी होण्यास मदत होते आणि त्यानंतर जमिनीच्या मगदूराप्रमाणे आणि हंगामानुसार पाणी द्यावे.
खत व्यवस्थापन : लागवडीसाठी वाफे तयार करण्यापूर्वी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी जमिनीत मिसळावे. मिरची पिकासाठी 100:50:50 किलो नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टरी द्यावे आणि अर्धा नत्राचा हप्ता लागवडीनंतर 4 ते 6 आठवड्यांनी म्हणजे फूल आणि फळ धारणेच्या वेळी द्यावा. खतांची मात्रा दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.
आंतरमशागत : आवश्यकतेनुसार खुरपणी करून पीक स्वच्छ ठेवावे. जमिनीत हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर द्यावी म्हणजे झाडे कोलमडणार नाही.
पाणी व्यवस्थापन : मिरची पिकाला गरजेनुसार पाणी देणे जरुरीचे असते. पाणी जास्त किंवा कमी झाल्यास फुलांची गळ होते. जमिनीचा प्रकार, पाऊसमान आणि तापमान विचारात घेऊन पाण्याच्या पाळ्या ठरवाव्यात. जमिनीच्या जगदूरानुसार व हंगामानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
पावसाळ्यात गरजेप्रमाणे 15 दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसाच्या अंतराने पाण्याचा पाळ्या द्याव्यात. झाडे फुलावर असताना पाण्याचा ताण पडल्यास फुले आणि फळ गळण्याचा धोका असतो. म्हणून या कालावधीत पाण्याचा ताण पडू नये. तसेच गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
काढणी आणि उत्पादन : पूर्ण वाढलेल्या हिरव्या फळांची तोडणी देठासह दर 10 ते 15 दिवसाच्या अंतराने करावी. हिरव्या मिरचीची तोडणी लागवडीपासून 60 ते 70 दिवसांनी सुरू होते आणि पुढे 3 ते 4 महिने तोडे सुरू राहतात. सर्वसाधारणपणे 8 ते 10 तोडे मिळतात.
वाळलेल्या मिरच्यासाठी मिरच्या पिकून त्या लाल रंगाच्या झाल्यावर तोडणी करतात व त्या चांगल्या वाळवतात. जातीपरत्वे उत्पादनात विविधता दिसून येते. हिरव्या मिरचीचे 100 ते 200 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. तर वाळलेल्या मिरचीचे 10 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते.
पीक संरक्षण : मिरची पिकाच्या चांगल्या आणि अधिक उत्पादनासाठी मिरची लागवडीपासून ते फळाच्या शेवटच्या तोडणीपर्यंत सर्व अवस्थामध्ये पीक संरक्षण करणे गरजेचे आहे.
कारण या पिकावर अनेक रोग आणि किडींचा प्रादुर्भाव जाणवतो. आणि त्यांना वेळीच बंदोबस्त न केल्यास सर्व पीक हातचे जाण्याचा धोका असतो. म्हणून शेतकरी बंधुनी जागरूक राहून पीक संरक्षणासाठी सर्व उपाय योजना वेळीच कराव्यात.
मिरची पिकावर प्रामुख्याने फुलकिडे, कोळी, फळे पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव होतो. फुलकिडे हे पानाच्या खालच्या बाजूस राहतात आणि पानासूत रस शोषून घेतात. त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वळतात, पाने लहान होतात यालाच बोकड्या किंवा चुरडा मुरडा म्हणतात. या किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते.
कोळी ही किडसुद्धा पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पानाच्या कडा खालील बाजूस वळतात. देठ लांब होतात आणि पाने लाहान होतात. चुरडा-मुरडा होण्यास कोळी ही किडसुद्धा कारणीभूत ठरते. या किडीचा प्रादुर्भाव कोरड्या हवामानात जास्त आढळतो.
फळे पोखरणार्या किडीची अळी फळांच्या देठाजवळील भाग खाते. त्यामुळे फळे गळून पडतात. या सर्वप्रकारच्या किडीमुळे 10 ते 30% पर्यंत नुकसान होऊ शकते.
वरील सर्व किडीच्या नियंत्रणासाठी कीड प्रतिकारक जातीची लागवड करावी. तसेच बियाण्यास कार्बोसल्फान 30 ग्रॅम + ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बीज प्रक्रिया करावी.
बीजप्रक्रिया केली नसल्यास वाफ्यात (2 बाय 1 मी.) रोपे उगवल्यानंतर दोन ओळीत कार्बोफ्युरॉन दाणेदार 30 ते 40 ग्रॅम किंवा फोरेट दाणेदार 20 ग्रॅम टाकावे किंवा डायमिथोएट 10 मि.ली. किंवा मिथिल डिमेटॉन 10 मि.ली., 10 लिटर पाण्यातून फवारावे. लागवडीच्या वेळी रोपे इमिडॅक्लोप्रिड 10 मि.ली. किंवा कार्बोसल्फान 30 मि.ली. + ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम + 10 लिटर पाणी या द्रावणात मुळे बुडवून नंतर लागवड करावी.
लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांनी निंबोळी पेंड हेक्टरी 400-500 किलो या प्रमाणात टाकावी. रोपाच्या पुर्नलागवडीनंतर पहिली फवारणी मिथिल डिमेटॉन किंवा मेटॅसिस्टाक्स 10 ते 15 मि.ली. किंवा सायपरमेथ्रीन 4 मि.ली. 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
त्यानंतर 12 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात. तसेच निंबाळी अर्क 4% याची सुद्धा फवारणी करावी. फवारणीसाठी एकच किटकनाशक न वापरता आलटून पालटून किटकनाशक वापरावे.
मिरचीवरील महत्त्वाचे रोग म्हणजे फळ मुज, फांद्या वाळणे, भुरी आणि लीफ कर्ल हे होय. फळकुज आणि फांद्या वाळणे या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हिरव्या किंवा लाल मिरची फळावर आणि पानावर वर्तुळावर खोलगट दिसतात. दमट हवेत जंतू वेगाने वाढतात आणि फळांवर काळपट चट्टे दिसतात.
अशी फळे कुजतात, फांद्या वाळणे या रोगाची सुरुवात शेड्याकडून होते. प्रथम शेंडे मरतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडे सुकून वाळतात. तसेच पानांवर आणि फांद्यावर काळे ठिपके दिसतात. हे रोग कोलओट्रिकम या बुरशीमुळे होतात.
या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्याचा नाश करावा तसेच डायथेन एम-45 किंवा ब्लायटॉक्स यापैकी एक 25 ते 30 ग्रॅम, 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर 15 दिवसांनी फवारावे. साधारण 3-4 फवारण्या कराव्यात.
भुरी या रोगामुळे पानाच्या पृष्ठभागावर आणि खालच्या बाजूस पांढरी बुरशी दिसतेे. रोग जास्त बळावल्यास पाने गळून पडतात. त्या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच पाण्यात विरघळणारे गंधक 30 ग्रॅम किंवा बावीस्टीन 10 ग्रॅम किंवा कॅराथेन 10 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. नंतरच्या 2-3 फवारण्या दर 15 दिवसाच्या अंतराने कराव्यात.
लिफ कर्ल (चुरडा-मुरडा) या रोगाचा प्रादुर्भाव फुलकिडे, मावा, कोळी आणि विषाणूमुळे होतो. या किडी पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पानाच्या शिरामधील भागावर सुरकुत्या पडून संपूर्ण पानांची वाढ खुंटते आणि झाड रोगट दिसते.
या रोगाच्या नियंत्रणासाठी रोप लागवडीनंतर 25 दिवसांनी 10 लिटर पाण्यात डायथेन एम-45 (25 ग्रॅम) + पाण्यात विरघळणारे गंधक 30 ग्रॅम + कुरॉक्रॉन 10 मि.ली. यांचे मिश्रण दर 15 दिवसांनी फवारावे. साधारणपणे 4 ते 5 फवारण्या कराव्यात. तसेच रोपवाटिकेत सांगितल्याप्रमाणे रोपे औषधामध्ये बुडवून लावावीत.
अशाप्रकारे मिरची पिकाची रोपवाटीकेपासून ते पीक काढणीपर्यंत योग्यप्रकारे काळजी घेतल्यास उत्पादन चांगले मिळून चांगला फायदा शेतकरी बंधुना निश्चितच होईल.
निर्यातीसाठी आवश्यक बाबी, प्रतवारी इत्यादी
1) फळे नाजूक आणि हिरव्या रंगाची असावीत.
2) हिरव्या मिरची फळाची लांबी 9 ते 10 सें.मी. असावी.
3) फळे रोग व किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त असावी.
4) खराब किंवा डाग पडलेली, पिवळी फळे निवडून वेगळी करावीत.
5) फळांची प्रतवारी करूनच निर्यातीसाठी पाठवावी.
6) फळांच्या पॅकिंगसाठी ज्यूटच्या धाग्यापासून तयार केलेल्या 9 बाय 10 मेश प्रति चौरस इंच पिशव्याचा वापर करावा आणि हवा खेळती राहावी.
7) टिश्यू पेपरचा वापर फळे गुंडाळण्यासाठी करावा जेणे करून बाष्पीभवन कमी करून टिकण्याचा कालावधी वाढविण्यासाठी उपयोग होतो.
8) फळे तोडणीवेळी शक्यतो थंड वातावरण असावे. तसेच तापमान 7-10 अंश सें.ग्रे. आणि आर्द्रता 90-95 टक्के असावी.
9) पॅकिंगसाठी टिश्यू पेपरचा वापर करावा. कोरोगेटेड (सी.एफ.बी) फायबर बोर्ड बॉक्स वापरावेत.
10) निर्यातीवेळी जास्तीत जास्त थंड हवा खेळती राहील याचा विचार करावा.
11) निर्यातीसाठी फळे पाठविण्यासाठी फळांवर किटकनाशकांचा किंवा बुरशीनाशकाचे अवशेष हे एम.आर. लेव्हलपेक्षा जास्त नसावेत.
12) ज्या बुरशीनाशकावर किंवा किटकनाशकावर भाजीपाला पिकामध्ये वापरण्यास बंदी घातली आहे अशी औषधे फवारणीसाठी वापरू नयेत.
सचिन संभाजी मुंडे
Ph.D Scholar
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ Mob 8983143887
राहुल रमेश इंगोले
अग्रीकल्चर ट्रेनर
योग दिना निमित्त ‘राज योग मेडिटेशन ‘विषयावर वेबिनार
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});