आठवड्यात पाच दिवस काम आणि उर्वरित दिवस सुट्टीची मागणी करत असलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षा आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यापूर्वी पाच दिवसांच्या आठवड्यावर सरकार अनुकूल असल्याचे वृत्त समोर आले होते, तसेच लवकरच बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू होईल, असा दावा केला जात होता. परंतु आता या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच बँक असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज युनियनमध्ये विविध मुद्द्यांवर सामंजस्य झाल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांना निवडणुकीपूर्वी पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याची भेट मिळण्याची आशा वाढली होती. मात्र, आता लाखो बँक कर्मचाऱ्यांची निराशा होणार असल्याचे दिसून येत आहे.
पाच दिवस कामाच्या आठवड्यावर अर्थमंत्र्यांनी दिले संकेत
खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँक कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या आठवड्यावर अपडेट दिले आहे. १४ मार्च रोजी IIT गुवाहाटी येथे विकास भारत ॲम्बेसेडर कॅम्पस डायलॉगला संबोधित करताना अर्थमंत्री सीतारामन यांना बँक कर्मचाऱ्यांच्या वर्क-लाइफ बॅलन्स आणि आठवड्याला फक्त पाच दिवस काम करण्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेबद्दल विचारले गेले. ज्यावर उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी अफवांवर लक्ष देऊ नका, असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
बँक युनियन आणि असोसिएशन यांच्यात झालेल्या करारानंतर आता अर्थ मंत्रालयाच्या मान्यतेसाठी प्रलंबित असल्याच्या अटकळ बांधल्या जात होत्या. तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखेंच्या घोषणेपूर्वी अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी अपेक्षित होती मात्र, आजपर्यंत असे झाले नसून सध्या तरी तसे होणार नसल्याचे स्पष्ट संकेत अर्थमंत्र्यांनी दिले.
कर्मचारी आणि संघटनेने धरली मागणी
यापूर्वी ८ मार्च रोजी बँकिंग संघटना, इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि विविध बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना यांच्यात एक करार झाला होता ज्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचे मान्य करण्यात आले. त्यानंतर आता विविध सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात १७% वाढ होईल. तर, पगाराव्यतिरिक्त महागाई भत्त्यात (DA) वाढीसह इतर काही लाभांवरही चर्चा झाल्याचे समोर आले.
मात्र, कर्मचाऱ्यांच्या जुन्या मागणीबाबतची परिस्थिती अद्यापही स्पष्ट झाली नाही. बँकांमध्ये आठवड्याला फक्त पाच दिवस काम आणि दर आठवड्याला दोन दिवस (शनिवार-रविवार) सुट्टी असावी, अशी कर्मचारी गेल्या वर्षापासून मागणी धरून आहेत. सध्या बँक कर्मचाऱ्यांना दर रविवारी सुट्टी मिळते, मात्र दर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात तर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी बँका सुरू राहतात.
लवकरच आचारसंहिता लागू होणार
निवडणूक आयोग आज दुपारी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक (शेड्युल) जारी करणार असून निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करताच देशात आचारसंहिता लागू होईल त्यानंतर केंद्र सरकार बँक कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत, बँक कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा कामाचा आठवडा मिळणार की नाही, हे आता आगामी लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक येणारं नवीन सरकार ठरवेल हे स्पष्ट आहे.