राज्यातील तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तगडा झटका दिला आहे. बेहिशेबी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमविल्याप्रकरणी तीन शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. लाचखोरी करत शिक्षण क्षेत्राला कलंक लावलेल्या माजी शिक्षणाधिकारी असलेल्या किरण लोहार, तुकाराम सुपे आणि विष्णू कांबळे विरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
किरण लोहार, तुकाराम सुपे, विष्णू कांबळे विरोधात गुन्हा दाखल
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तुकाराम नामदेव सुपे (वय 59, तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे, (सध्या सेवा निवृत्त) रा. रा.कल्पतरू, गांगर्डेर नगर,सुदर्शन हॉस्पिटल समोर, पिंपळे गुरव, पुणे) विष्णू मारुतीराव कांबळे (वय 59, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सांगली) त्याची पत्नी सौ. जयश्री विष्णू कांबळे (सर्व रा. शिवशक्ती मैदान पाठीमागे बारबोले प्लॉट, शिवाजीनगर, बार्शी जिल्हा. सोलापूर) आणि किरण आनंद लोहार (वय 50, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, पत्नी सुजाता किरण लोहार ( वय 44) मुलगा निखिल किरण लोहार (वय 25 सर्व रा. प्लॉट नं. सी. 2, आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांच्याविरोधत गुन्हा दाखल केला आहे. एकाचवेळी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील बहुधा ही पहिलीच वेळ आहे.
विष्णू कांबळेवर 82 लाखांच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणी गुन्हा दाखल
सांगली जिल्हा परिषदेकडील तत्कालीन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विष्णू मारूतीराव कांबळेच्या 82 लाखांच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणी सांगली लाचलुचपत प्रतिबंधककडून सांगलीच्या विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी पदावर असताना विष्णू मारूतीराव कांबळे यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या तसेच त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या बेहिशेबी मालमत्ताची तपासणी केली. त्यामध्ये कांबळे दाम्पत्याच्या नावे 82 लाख 99 हजार 952 रूपयांची बेहिशेबी असल्याचे स्पष्ट झाले. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 16 जून 1986 ते दि. 6 मे 2022 या कालावधीत कांबळे यांनी भ्रष्ट आणि गैरमार्गाने जमवलेल्या तसेच कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा बेहिशेबी मालमत्तांचे परीक्षण केले. त्यामध्ये बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कांबळे दाम्पत्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
म्हणून किरण लोहार चर्चेत
सोलापूर जिल्ह्यात शिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना किरण लोहार प्रसिद्धीच्या झोतात आले होते.सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात किरण लोहार यांचा कार्यकाळ मोठा प्रसिद्ध झाला होता.ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले यांच्यात आणि किरण लोहार यांच्यामध्ये रजा मंजूर करण्यावरुन झालेला वाद राज्यभर चर्चेत होता. किरण लोहार यांच्यावर ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनची कारवाई झाली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर युनिटने तपास सुरूच ठेवला होता.सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह पत्नी व मुलाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम १३ (१) (ई), १३ (२) सहकलम भारतीय दंड संहिता कलम १०९ तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम २०१८ चे कलम १३(१) (ब), १३(२) सहकलम १२ प्रमाणे बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अँटी करप्शन सोलापूर युनिटने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार किरण लोहार यांच्याकडे व पत्नी आणि मुलाच्या नावे जवळपास ५ कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयांची बेनामी मालमत्ता आढळून आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अपसंपदा कायद्याअंतर्गत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय तुकाराम सुपे आणि विष्णू कांबळे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.