भरधाव दुचाकीने घेतला ज्येष्ठ नागरिकाचा जीव,वसमत रोड बनला मृत्यूचा सापळा

परभणी,दि 10 ः
वसमत रोडवरील अपघाताची शृंखला बंद होताना दिसत नाही. गजबजलेला शिवशक्ती परिसर अपघाताचा हॉटस्पॉट बनत चालला आहे शुक्रवार (दि.९) रोजी सांयकाळी शिवशक्ती समोर अल्पवयीन मुलगी चालवत असलेल्या भरधाव दुचाकीने एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव घेतला.

अधिक माहिती अशी की स्नेहशारदा नगरातील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक भानुदासराव भोसले (वय ७१) आपले काम आटोपून शिवशक्ती बिल्डिंगकडून वसमत रोड ओलांडत असताना अल्पवयीन असलेली मुलगी भरधाव वेगाने स्कुटी चालवत होती.शिवशक्ती समोर त्या स्कुटीने भोसले यांना उडवले. डोक्याला जास्त मार लागल्याने खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करून उपचार सुरू केले. उपचारादरम्यान शनिवार रोजी पहाटे त्यांचे निधन झाले. विद्यार्थीप्रिय शिक्षक असलेले भा.ना. भोसले अचानक गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कृषी विज्ञान केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ प्रशांत भोसले व जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सौ.कांचन कारेगावकर  यांचे ते वडील तर सामाजिक कार्यकर्ते रणजित कारेगावकर यांचे ते सासरे होत. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. खानापूर येथील स्मशानभूमीत शनिवार रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 शिवशक्ती परिसर बनला धोकादायक
वसमत रोडवर मागील अनेक महिन्यापासून सातत्याने अपघात होत आहेत. या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. वेगाने धावणाऱ्या दुचाक्यांचा वेग कोण कमी करणार? रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेल्या अतिक्रमणाने वाहनांची कोंडी होत आहे. या संदर्भात उचित कारवाई कोण करणार? असे प्रश्न सामान्य नागरिकांत निर्माण झाली आहेत.त्यात शिवशक्ती परिसर हा गजबजलेला असतो.या ठिकाणी अनेक रस्ते एकत्र येतात.त्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्यांची संख्या अधिक तर या ठिकाणी मोठे गतिरोधक नसल्याने दोन्ही बाजुने येणारे वाहने भरधाव असतात.त्यामुळे नेहमीच या ठिकाणी अपघात होत आहेत.

वसमत रोडवर वाहने चालवीत असताना सामान्य नागरिक आपला जीव मुठीत घेऊन जात आहेत.
महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर पोलीस वाहतूक शाखा या संदर्भाने कारवाई करील का? असा प्रश्न सामान्य नागरिकांतून विचारल्या जात आहे.

गतिरोधक मोठे करण्याची गरज
वसमत रोड हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने बांधकाम विभाग सातत्याने नियम पुढे करत मोठे करत टाकण्यास मनाई करत आहे परंतु गतिरोधक नसल्यामुळे वाहने सुसाट वेगाने धावत असल्याने दररोज येथे अपघात होत आहेत श्री शिवाजी महाविद्यालय ते खानापूर फाटा या दरम्यान ठिकठिकाणी मोठे मोठे गतिरोधक टाकण्याची गरज आहे

Comments (0)
Add Comment