सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. देशमुख हत्या प्रकरणी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या, धनंजय मुंडे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करणाऱ्या धस यांनीच मुंडे यांची भेट घेतल्याच्या माहितीनं खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात दोघांची भेट झाली. ही भेट अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती. देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आका, आकाचा आका म्हणत धस यांनी धनंजय मुंडे आणि त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला लक्ष्य केलं आहे.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड अटक झाली. सध्या तो तुरुंगात आहे. कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे. या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होऊ नये म्हणून मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी गेल्या २ महिन्यांपासून सुरु आहे. देशमुख यांचं कुटुंब, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं लावून धरलेली आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धस यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे मुंडे यांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच आता मुंडे आणि धस यांच्या गुप्त भेटीची माहिती समोर आली आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
‘धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालं आहे, ज्या दिवशी रात्री त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही, तर दिवसा त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार. फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो, तर त्याच्यात गहजब करण्यासारखं काय आहे?’, असा सवाल सुरेश धस यांनी विचारला आहे.
‘बावनकुळे साहेब आणि माझी आत्ता भेट होईल. तब्येतीची चौकशी करणे यात गैर नाही. संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यात काहीही संबध नाही. कृपया जोडू नये. कुणाची मध्यस्थी नाही. भरणे मामांनी रात्री दवाखान्यात नेलं अशी माहिती मिळाली, म्हणून त्यांना भेटायला गेलो. काहीही चर्चा झाली नाही. साडेचार तास चर्चा झाली असं कोण म्हणालं? बावनकुळे साहेब म्हणाले असतील तर त्यांना विचारा’, असं सुरेश धस म्हणाले.
त्यांना भेटल्यानंतर बाहेर आल्यानंतर काय केलं? हे तुम्ही पाहून घ्या. एक-दोन दिवसात आणखी काही सांगणार आहे, तेव्हा तुम्हाला कळेल. मी अजून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही. त्यांचा राजीनामा त्यांच्याच पक्षातले लोक आणि इतर लोक मागत आहेत. त्यांचा राजीनामा घेणं न घेणं अजित पवारांच्या हातात आहे. लढा सुरूच राहणार आहे, हे लोक फाशीवर जाईपर्यंत लढा सुरूच राहणार आहे’, असंही सुरेश धस यांनी स्पष्ट केलं.