फरार प्रशांत कोरटकर अखेर सापडला, तेलंगणातून अटक

मुंबई : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आली आहे. तेलंगणातून अटक झाल्याची माहिती समोर आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल देखील आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. या प्रकरणी कोल्हापूरमध्ये प्रशांत कोरटकर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर हा 25 फेब्रुवारीपासून फरार होता. त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. नागपुरातून फरार झालेला कोरटकर हा चंद्रपूरमध्ये लपून बसला होता. कोल्हापूर पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला होता.

प्रशांत कोरटकरला आता एका महिन्यानंतर तेलंगणामधून अटक केली आहे. त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याला ताब्यात घेतील. इंद्रजीत सावंत यांनी कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. त्यामुळे कोरटकरला आता कोल्हापूरला आणण्यात येणार आहे.

प्रशांत कोरटकरचा अंतरिम जामीन उच्च न्यायालय फेटाळणार असल्याची जाणीव झाल्यानंतर त्याच्यासमोर कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही. त्यामुळे त्याला पोलिसांसमोर शरण येण्याशिवाय कोणताही पर्यात नव्हता. त्याचमुळे आता पोलिसांनी त्याला अटक केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे.

प्रशांत कोरटकरने आधी कोल्हापूर न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता. कोल्हापूर न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. पण कोल्हापुरात जी चूक केली होती तीच चूक कोरटकरने उच्च न्यायालयात केली. उच्च न्यायालयातही कोरटकरने अंतरिम जामिनासाठी अर्ज केला. पण एका न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतर वरचे न्यायालयही तो जामीन स्वीकारत नाही. त्याचमुळे कोरटकरसमोर कोणताही पर्याय नसल्याची माहिती आहे.

  • 25 फेब्रुवारी मध्यरात्री 12.08 वा. प्रशांत कोरटकरचे इंद्रजित सावंत यांना दोन फोन केले
  • प्रशांत कोरटकरने फोनवरून इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याची सोशल मीडियावरून सावंत यांची पहाटे माहिती
  • छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य बाबत सावंत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
Comments (0)
Add Comment