नागपूर: प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा आज पहाटे रस्ता ओलांडताना अपघात झाला होता. या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागला आहे. त्यांच्या डोक्याला टाकेही पडले आहेत. बच्चू कडू यांच्यावर अमरावतीतील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, आता त्यांना नागपूरच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे. बच्चू कडू यांना नागपूरच्या रुग्णालयात का नेण्यात आलं? याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, माझी प्रकृती उत्तम आहे, असं बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
नेमकं काय घडलं?
बुधवारी (११ जानेवारी) सकाळी अमरावतीत सहा ते साडेसहाच्या दरम्यान बच्चू कडू रस्ता ओलांडत होते. तेव्हा एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू गंभीर जखमी झाले आहेत. अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरु असून, डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. तसेच, बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मात्र, सकाळी प्राथमिक उपचार झाल्यानंतर बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आळं आहे. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी नयना कडू होत्या. बच्चू कडू यांच्या अपघाताची माहिती मिळताच मंत्री प्रवीण पोटे यांनी रुग्णालयात येऊन बच्चू कडू यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दरम्यान, नागपूरमधील रुग्णालयात बच्चू कडू यांच्या पायाचा एक्सरे काढण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या चाचण्या करण्यात येणार आहे. अपघातात पायाचे हाड तर फ्रॅक्चर झालेलं नाही ना? याची तपासणी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं. मात्र, बच्चू कडू यांची प्रकृती स्थिर असून काळजी करू नये, असं बच्चू कडू यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.
काही दिवसांपासून आमदारांच्या अपघाताची मालिका
दरम्यान, एक महिन्यांच्या कार्यकाळात राज्यातील तीन आमदारांच्या कारचा अपघात झाला आहे. २४ डिसेंबरला भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती नदीत कोसळली. या अपघातात गोरे आणि त्यांचे सहकारी जखमी झाले होते.
४ जानेवारीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात धनंजय मुंडे यांना मुक्का मार लागला आहे. सुदैवाने मुंडे या अपघातातून बचावले आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहे.