लाडकी बहीण योजने नंतर आता सरकारने केली नव्या योजनेची घोषणा

आज बांद्रा-कुर्ला संकुलात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांच्या अंतर्गत उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान सुरु राहणाऱ्या ‘महालक्ष्मी सरस’ विक्री प्रदर्शन २०२५ चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांनी ‘पंचवीस लाख लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट’ असल्याची घोषणा केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी उमेदच्या अभियानाच्या प्रगतीचा स्वतः साक्षीदार आहे. ‘महालक्ष्मी सरस’ हा उपक्रम गेली २१ वर्ष अविरत सुरु आहे. या उपक्रमामुळे राज्यभरातील महिला बचत गटांना एक हक्काते व्यासपीठ मिळाले आहे. या बचत गटांची उत्पादने चांगली असतात. पण त्यांच्या विक्रीसाठी अनेक उपाययोजना कराव्या लागतात.’

‘महिला बचत गटाच्या उत्पादनाची विक्री व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद मॉल उभारले जाणार आहेत. या उमेद मॉल्ससाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. प्राथमिक स्तरावर दहा जिल्ह्यांत उमेद मॉल उभारण्यात येतील’, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

‘उमेदच्या माध्यमातून ६० लाखांपेक्षा जास्त कुटुंब आर्थिक प्रगती करत आहेत. यामार्फत बचत गटातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी ही योजना आणली आहे. ज्या महिलांचे वार्षिख उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, त्यांना लखपती दीदी म्हटले जाईल’, अशी माहिती देखील फडणवीस यांनी दिली.

आज महाराष्ट्रात ११ लाखांपेक्षा जास्त ‘लखपती दीदी’ आहेत. लवकरच २५ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचा सरकारचा मानस आहे. आगामी कालावधीत एक कोटी महिला लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. महिला सक्षमीकरणासाठी लेक लाडकी, लाडकी बहीण योजना सरकारने आणल्या आहेत. लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी आम्ही सदैव पाठिशी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Comments (0)
Add Comment