कृषि मंत्र्यांची आमदारकी धोक्यात, कोर्टाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा

महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार अशी शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता नाशिक जिल्हा न्यायालया माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध निकाल दिला असून माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मंत्रिपद धोक्यात 

माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांच्याविरुद्ध फसवणूकचा गुन्हा दाखल केला होता. 30 वर्षांपूर्वी म्हणजेच 1995 साली हे प्रकरण समोर आलं होतं. अशातच आता नाशिक जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात अखेर निर्णय सुनावला आहे. भादंवि 420, 465, 471,47 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे.

…अन् माणिकराव कोकाटे कृषीमंत्री झाले

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे शरद पवार गटाचे उमेदवार उदय सांगळे यांचा पराभव करत निवडून आले. प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिन्नर येथील आयोजित सभेत तुम्ही फक्त निवडून द्या, मी माणिकराव कोकाटे यांना मंत्री करतो असा शब्द दिला होता. मंत्रीमंडळामध्ये त्यांना महत्वाची जबाबदारी दिली जाईल ,असे आश्वासन अजित पवार यांनी सिन्नरच्या जनतेला दिले होते. अखेर अजित पवार यांनी शब्द पाळलेला अन् माणिकराव कोकाटे कृषीमंत्री झाले होते.

दरम्यान, नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे हायकोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. मात्र, आता कोर्टाच्या निर्णयाने मंत्रीपद गमावावं लागणार की काय? असा सवाल विचारला जात आहे.

Comments (0)
Add Comment