अजित पवार म्हणाले..आता तुम्ही बघाच…कोल्हे म्हणतात ‘है तय्यार हम’

मागील दोन-तीन वर्षांपूर्वी राजीनामा देतो म्हणून सांगत होते मात्र निवडणूक जवळ आली की पदयात्रा सुचतेय, अशा निशाणा साधताना आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हेंविरोधात प्रबळ उमेदवार देऊन कोल्हेंचा पराभव करणारच, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवला. निवडणूक जवळ आली की कुणाला संघर्षयात्रा तर कुणाला पदयात्रा सुचतेय. लोकशाहीत प्रत्येकाला अशा यात्रा काढण्याचा अधिकार आहे. पण ५ वर्षे मतदारसंघात लक्ष द्यायचं होतं, अशा शब्दात अजित पवार यांनी कोल्हेंवर टीका केली. अजित पवार यांच्या याच टीकेला आणि पराभूत करण्याच्या चॅलेंजला खासदार कोल्हे यांनीही उत्तर देत ‘है तय्यार हम’ म्हणत शड्डू ठोकला.

शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडे पर्यायी उमेदवार आहे. पुढच्या निवडणुकीत आमचा उमेदवार आम्ही निवडून आणू, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. तसेच त्यांनी शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार आणि शरद पवार गटातील नेते अमोल कोल्हे यांना थेट आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे पदयात्रा काढणार आहेत. याबाबत अजित पवारांना विचारल्यावर त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. तसेच पुढच्या निवडणुकीत कोल्हेंविरोधात उमेदवार देऊन त्या उमेदवाराला निवडून आणू असं आव्हान दिलं आहे.

अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले होते की, “निवडून आल्यानंतर दीड वर्षातच त्यांनी (अमोल कोल्हे) राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. आता निवडणूक जवळ आल्यानंतर त्यांना पदयात्रा सूचत आहे”. अजित पवारांच्या आव्हानावर प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे म्हणाले, “१०० टक्के मी निवडणूक लढवणार. शरद पवार घेतील तो निर्णय मला मान्य असेल.” तसेच अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचं आव्हान स्वीकारलं आहे.

अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, अमोल कोल्हेंना जे वाटलं ते वक्तव्य त्यांनी केलं. मला वाटलं ते मी बोललो. तीच गोष्ट किती वेळा उगळणार. अमोल कोल्हे यांनी आव्हान स्वीकारलं असेल तर आता तुम्ही बघाच. हा अजित पवार एखादं चॅलेंज (आव्हान) देतो तेव्हा जिंकूनच दाखवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. निकाल लागल्यावर तुम्हाला कळेलच.

अजित पवार रविवारी म्हणाले होते, “शिरूरच्या खासदाराने पाच वर्षे त्याच्या मतदारसंघात लक्ष घातलं असतं तर खूप चांगलं झालं असतं.” त्यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. अमोल कोल्हे म्हणाले, “काही चुकलं असेल तर अजित पवार यांनी त्याच वेळी माझा कान धरला असता तर बरं झालं असतं.” यावर परत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, त्यांना उमेदवारी मी दिली होती. त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जिवाचं रान केलं होतं. मधल्या काळात त्यांच्या लोकसभेअंतर्गत येणाऱ्या एकाही विधानसभा मतदारसंघात ते फिरकले नाहीत. पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे.

“अमोल कोल्हे यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती”

अजित पवार म्हणाले, खासदार झाल्यावर दीड वर्षात त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. ते म्हणाले होते, ‘मी एक कलावंत आहे, माझ्या चित्रपटांवर परिणाम होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही. याचा आर्थिक गोष्टीवर परिणाम होतोय,’ असं वरिष्ठांना आणि मला सांगत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. मी हे काही सांगणार नव्हतो. पण, आता निवडणुका आल्यानंतर त्यांना उत्साह आला आहे. त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सूचत आहे.”

अजित पवार यांच्या चॅलेंजवर अमोल कोल्हे काय म्हणाले?

“दादा हे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देणं, एवढा मी मोठा नेता नाहीये. मी एक साधा कार्यकर्ता आहे. पण मला जर शिरूरच्या रिंगणात उतरवलं तर १०० टक्के मी या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक लढणार. शरद पवार यासंदर्भात जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. पण निवडणूक एक माध्यम आहे आणि सत्ता हे एक साधन आहे. जनता ठरवेल सत्तेच्या बाजूने राहायचं की तत्व मुल्ये या गोष्टीच्या बाजूने राहायचं, अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना जशास तसं उत्तर दिलं. तसेच दादांच्या बंडखोरीला डिवचून प्रचारात कोणते मुद्दे असतील, याचे संकेतच दिले.

होय मी निवडणूक लढणार!

शिरूरचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलं. त्यांच्याच नेतृत्वाखाली मी शिरूरचं प्रतिनिधित्व करतोय. निवडणूक म्हटलं की आव्हान प्रतिआव्हानच द्यायला पाहिजे असं नाही. निवडणूक म्हणजे पुढची ५ वर्षे या भागाचं प्रतिनिधित्व कोण करणार, इथले प्रश्न संसदेत कोण मांडणार, असं याकडे बघितलं गेलं पाहिजे. दादा हे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देणं, एवढा मी मोठा नेता नाहीये. मी एक साधा कार्यकर्ता आहे. पण मला जर शिरूरच्या रिंगणात उतरवलं तर १०० टक्के मी या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक लढणार. शरद पवार यासंदर्भात जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असंही ते म्हणाले.

Comments (0)
Add Comment