मान्सून यंदा केरळमध्ये वेळेआधीच दाखल होणार आहे. यामुळे मान्सूनची (Mansoon Update) वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना चांगला दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. या वर्षी मान्सूनची सुरूवात लवकर होऊ शकते. केरळमध्ये ३१ मे च्या सुमारास मान्सून सुरू होण्याची शक्यता आहे.
यंदा चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरात निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहेत. यापूर्वीच हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १९ मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील 10 दिवसांत मान्सून केरळमध्ये येणार आहे. म्हणजेच यंदा 31 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहचणार आहे. मान्सून केरळमध्ये आल्यावर त्याची महाराष्ट्राकडे वाटचाल सुरु होते. केरळमधून पुढील 4 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे.
देशात अल निनो हवामान प्रणाली कमकुवत होत आहे. ला निना परिस्थिती सक्रिय होत आहेत. यंदा मान्सून चांगला होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे वेळेपूर्वीच मान्सून भारतात येऊ शकतो, असंही हवामान विभागाने सांगितलं आहे.