एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले बाजोरिया पिता-पुत्र हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्याचं वृत्त राजकीय वर्तुळात पसरलं होतं. विशेष म्हणजे ठाकरेंनी त्यांना पक्षात परत घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिल्याचं बोललं जात होतं. मात्र यानंतर उलट गोपीकिशन बाजोरिया यांनीच या अफवा असल्याचं सांगत पुनर्मीलनाच्या चर्चांचा इन्कार केला आहे. दीड वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनीच मला दहा फोन केले होते, तेही मी उचलले नव्हते, मग आता त्यांची भेट घेण्याचा विषयच येत नाही, असं बाजोरिया म्हणाले.
विधान परिषदेचे माजी आमदार गोपीकिशन बजोरिया यांनी सुपुत्र विप्लव यांच्यासह दीड वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
ठाकरेंच्या भेटीचं वृत्त नाकारलं
दरम्यान, गोपीकिशन बजोरिया यांनी लेकासह उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र हे वृत्त खोटं आणि खोडसाळपणाचं असल्याची प्रतिक्रिया खुद्द माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दिली आहे.
दहा फोन उचलले नव्हते
गोपीकिशन बजोरिया आणि विप्लव बाजोरिया हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आणि त्यांना भेट नाकारण्यात आली असं खोडसाळपणाचं आणि चुकीचं वृत्त पुरवण्यात आलं आहे. दीड वर्षांपूर्वी त्यांनी मला दहा फोन केले होते, ते मी उचलले नव्हते, तर आता त्यांची भेट घेण्याचा विषयच येत नाही. अशा प्रकारची बातमी वाहिन्यांना उद्धव ठाकरेंनी देणं सयुक्तिक नाही, असंही बाजोरिया म्हणाले.
कोण आहेत गोपीकिशन बजोरिया?
गोपीकिशन बजोरिया हे अकोल्यातील बडे शिवसेना नेते आहेत. अकोला वाशिम बुलढाणा मतदारसंघातून त्यांनी विधानपरिषदेवर नेतृत्व केलं आहे. २००४, २०१० आणि २०१६ असे सलग तीन वेळा त्यांना आमदारकी मिळाली होती. त्यांचे सुपुत्र विप्लव बाजोरिया हे २०१८ मध्ये परभणी-हिंगोली मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून आले. २०२२ मध्ये त्यांच्या गळ्यात विधानपरिषदेत (तत्कालीन) बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मुख्य प्रतोदपदाची माळ घालण्यात आली.