मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी आता पोलीस तैनात असणार आहे. जरांगे यांना सरकारी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आजपासून जरांगे यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने मनोज जरांगे यांना पोलीस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी 24 तास दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान, त्याआधी सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून दोन कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी नेमण्यात आले आहेत.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात 29 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणस्थळी पोलिसांची लाठीचार्ज झाला आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटू लागले. त्यानंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन संपूर्ण राज्यभरात पोहचले. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली होती. जरांगे यांच्या आंदोलनाने राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा पुन्हा एकदा पेटला. मराठा समाजाने आरक्षणासाठी मुंबईवर मोर्चा काढला.
या मुंबई मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर नवी मुंबईत आल्यानंतर राज्य सरकारने जरांगे यांना सरकारने आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.