मोठी बातमी… पुण्यात जीबी सिंड्रोम रुग्णांची संख्या १४९ वर

पुणे : राज्यातील विविध भागात जीबी सिंड्रोमचे रुग्ण आढळू लागले आहेत. या नव्या जीबी सिंड्रोम आजाराने सर्वांची झोप उडवली आहे. पुणे या आजाराचं हॉटस्पॉट होऊ लागलं आहे. पुण्यातील जीबी सिंड्रोम रुग्णांची संख्या १४९ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत पुण्यात ५ संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगाल, राजस्थानमध्येही जी बी सिंड्रोमचे रुग्ण आढळू लागले आहेत. यानंतर तेलंगणामध्येही एका महिलेमध्ये जी बी सिंड्रोम आजाराचे लक्षणे आढळले आहेत. या महिलेला हैदराबादमधील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

पुणे शहरात जी बी सिंड्रोमच्या वाढत्या रुग्णामुळे महापालिका अलर्ट झाली आहे. पुण्यात जी बी सिंड्रोमच्या रुग्णात कशी वाढ झाली, याचा शोध पुणे महापालिकेचे अधिकारी घेत आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पाणी शुद्ध करण्याची प्रतिक्रिया देखील तपासली जात आहे. अधिकाऱ्यांकडून तपासणीसाठी पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. या विषाणूमध्ये कॅम्पलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरसचाही समावेश आहे. यामुळे आजार पसरण्याचं मूळ शोधलं जाऊ शकतं.

जीबीएस म्हणजे काय?

जीबीएस हा एक दुर्मिळ ऑटोइम्युन आजार आहे. या आजारामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती परिधीय मज्जासंस्थेवर परिणाम होतो. या आजाराचे निश्चित कारण माहीत नाही. हा आजार संसर्गामुळे होतो.

आजाराची लक्षणे

पायामध्ये अशक्तपणा किंवा मुंग्या येणे. त्यानंतर ही संवेदना शरीराच्या वरच्या भागात आणि हातापर्यंत जाऊ शकते. हालचाल करण्यात अडचण येणे (उदा. चालणे, डोळे किंवा चेहरा हलविणे यामध्ये अडचण येणे) , वेदना, मुत्राशय किवा आतडे नियंत्रित करण्यास अडचण, वेगवान हृदयगती, कमी किंवा उच्च रक्तदाब, श्वास घेण्यास किंवा गिळण्यास अडचण, अंधुक दृष्टी या अडचणी येतात.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

नागरिकांनी पिण्याचे पाणी दुषित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाणी उकळून प्यावे. अन्न स्वच्छ व ताजे खावे. वैयक्तिक व परिसर स्वच्छ ठेवावा. शिजवलेले आणि न शिजवलेले अन्न एकत्र ठेवू नये. न शिजवलेले अन्न खाऊ नये.

खासगी डॉक्टरांना आवाहन

खासगी वैद्यक व्यवसायिकांना या आजाराचे रुग्ण आढळल्यास त्वरीत नजिकच्या शासकीय संस्थेस माहिती देण्यात यावी. जिल्ह्यातील नागरिकांनी लक्षणे आढळून आल्यास त्वरित नजिकच्या आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments (0)
Add Comment