परशुराम जन्मोत्सवानिमित्त सेलू येथे रक्तदान शिबिर; महिलांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलू / नारायण पाटील – भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने सेलू येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः महिलांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.

शिबिराची सुरुवात सकाळी भगवान परशुराम व ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात एकूण ८२ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये ११ महिलांचा आणि ७१ पुरुषांचा समावेश होता. सर्वांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून रक्तदान केले.

या उपक्रमाचे आयोजन श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीने केले होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी समितीने विशेष मेहनत घेतली. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, सेलू परिसरात सामाजिक भान आणि एकोप्याची भावना अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी विविध समाजबांधवांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला. या सहकार्याबद्दल भगवान परशुराम जन्मोत्सव समिती सर्व रक्तदात्यांची आणि नागरिकांची ऋणी असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments (5)
Add Comment