महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. २३७ जागांचं प्रचंड बहुमत महायुतीला मिळालं. या यशात मतदारांचा वाटा तर होताच. पण सर्वात महत्त्वाचा वाटा ठरला तो लाडक्या बहिणींचा. कारण लोकसभा निवडणूक निकालात फटका बसल्यानंतर लाडकी बहीण योजना आणली. या योजनेत पात्र महिलांना प्रति महिना १५०० रुपये दिले गेले आहेत. दरम्यान या योजनेत २१०० रुपये कधी दिले जाणार याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माहिती दिली आहे.
माझी लाडकी बहीण योजना काय आहे?
ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. २०२४ च्या जुलै महिन्यापासून या योजनेला सुरुवात झाली. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये १५०० रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत एकूण नऊ हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. मार्च महिन्याचा हाप्ता देखील लाभार्थी महिलांना मिळाला आहे. मध्य प्रदेशातील मेरी लाडली बहना या योजनेच्या धर्तीवर माझी लाडकी बहीण योजना आणण्यात आली. या योजनेचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत झाला हे स्पष्टच दिसून आलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
राज्यातील सगळ्या योजना सुरू आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, ती अद्यापही सुरू आहे, पण काहीजण म्हणत होते ही योजना फसवी आहे, खरं नाही. पण, या योजनेसह, लेक लाडकी योजना, शासन आपल्या दारी व इतरही योजना सुरू आहेत. शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा ह्या योजनाही बंद नाहीत, त्या चालूच आहेत. ज्या पात्र बहिणी आहेत, त्यापैकी एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही, असा शब्दच एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना दिला. मात्र, निकषात बसणाऱ्या लाडक्या बहिणींनाच याचा लाभ मिळेल, जर चारचाकी गाडी असेल किंवा निकषात नसेल अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या माझा व्हिजन या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. तसंच २१०० रुपये आम्ही लवकरच लाडक्या बहिणींना देऊ असंही आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.