अक्षय्य तृतीयेला सोन्याशिवाय ‘या’ गोष्टी खरेदी करणे ठरु शकते लाभदायक

हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय्य तृतीया हा सण येतो. हिंदू आणि जैन धर्मामध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा हा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार पवित्र मानला जातो. अक्षय्य या शब्दाचा अर्थ ‘ज्याचा कधीच क्षय (नष्ट) होत नाही किंवा जे कधीच संपत नाही ‘ आहे असे मानले जाते. त्यामुळे अक्षय्या तृतीयेच्या दिवशी केलेली कोणतीही गोष्ट चिरंतर फलदायी असते अशी आपल्याकडे मान्यता आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर केलेल्या कामाचे श्रेष्ठ फळ मिळते. या वर्षी हा पवित्र सण २२ एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे.

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ असते असा मानस आहे. या दिवशी सोन्याच्या रुपातून भाग्यलक्ष्मी घरात प्रवेश करत असते. म्हणूनच तेव्हा लक्ष्मीची आराधना देखील केली जाते. कुटूंबाची भरभराट व्हावी या उद्देषाने सोन्यासह अन्य गोष्टी देखील खरेदी करणे लाभदायक असते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणत्या गोष्टी खरेदी करणे लाभदायक असते याबाबतची माहिती आम्ही देणार आहोत.

१. चांदीची भांडी

आपल्याकडे सोन्याप्रमाणे चांदी हा धातूदेखील शुभ आणि पवित्र मानला जातो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चांदीची भांडी, नाणी किंवा अन्य गोष्टी खरेदी केल्याने घरात लक्ष्मी प्रवेश करते अशी लोकांमध्ये श्रद्धा आहे. बरेचसे लोक या दिवशी प्रियजनांना चांदीच्या वस्तू भेट करत असतात.

२. रिअल इस्टेट

अक्षय्य तृतीयेला रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे खूप शुभ असते. दीर्घकालीन सुख-समृद्धी टिकून राहावी यासाठी अनेकजण या दिवशी जागा खरेदी करत असतात. हा दिवस व्यवहारासाठी उत्तम असतो.

३. स्टॉक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस भाग्यदायी असते असे म्हटले जाते. या दिवशी केलेल्या गुंतवणुकीमुळे खूप फायदा होत असल्याने लोक शुभ मुहूर्तावर शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्समध्ये पैसे गुंतवायला सुरुवात करतात.

४. विद्युत उपकरणे

अक्षय्य तृतीयेला खरेदी केलेली विद्युत उपकरणांमध्ये लवकर बिघाड होत नाही, ती जास्त काळासाठी टिकून राहतात असा लोकांमध्ये समज आहे. म्हणून या दिवशी बहुतांशजण विद्युत उपकरणे विकत घेण्यासाठी दुकानांबाहेर गर्दी करत असतात.

५. वाहने

दुचाकी किंवा चारचाकी घेण्याआधी प्रत्येकजण शुभ मुहूर्त पाहत असतो. अक्षय्य तृतीया हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी वाहन खरेदी करणे योग्य मानले जाते. असे केल्याने त्या वाहनामधून केलेला प्रवास सुरक्षित होतो असी लोकांमध्ये मान्यता आहे.

६. कृषी उपकरणे

अक्षय्य तृतीया हा दिवस ट्रॅक्टर आणि शेतीशी संबंधित अन्य यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठीचा आदर्श दिवस असतो. या दिवशी शुभ मुहूर्तावर खरेदी केलेल्या उपकरणांचा शेतीच्या कामांमध्ये वापर केल्याने भरभराट होते असे म्हटले जाते.

Comments (0)
Add Comment