स्पर्धा परीक्षेचे तंत्र आत्मसात करून आत्मविश्वासाने यश मिळवावे-अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांचे प्रतिपादन

परभणी (०७) मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. ही गुणवत्ता ओळखून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आत्मविश्वास, नियोजन, सातत्य आणि कठोर मेहनत करावी. ही तयारी करताना कधीकधी अपयश येते. अशावेळी स्पर्धा परीक्षेचे तंत्र आत्मसात करून आत्मविश्वासाने यश मिळवावे असे आवाहन परभणीचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी शुक्रवारी (ता.०७) केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष अतिथी मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. उत्कर्ष किट्टेकर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ.परिमल सुतवणे हे उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षेचे नियोजन आणि अभ्यास पद्धती या विषयावर बोलताना डॉ.प्रताप काळे पुढे म्हणाले, स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी परीक्षेचे तंत्र आत्मसात करणे गरजेचे आहे, जेणेकरून यश मिळेल. आज प्रचंड स्पर्धा आहे. अशावेळी नियोजन, सचोटी, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश मिळवू शकतो. अलीकडच्या काळात मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचे वाचन कमी झाले आहे. वर्तमानपत्र, संदर्भ ग्रंथ, पुस्तकं वाचण्याने बोलणे, लिहिणे तसेच विचार करण्यात सुधारणा होते. रोज किमान दोन चांगली वर्तमानपत्रे तसेच चांगली पुस्तके वाचायची सवय लावा. परीक्षेत स्पर्धा जास्त असली तरीही माझी जागा त्या दहा मध्ये आहे असा आत्मविश्वास आपल्यात आला पाहिजे. फक्त एकच परीक्षा आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी असते याचे गांभीर्य विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. कला शाखेतील विद्यार्थी कुठेही कमी नसतात ते प्रत्यक्ष क्षेत्रात अव्वल राहतात. त्यामुळे खचून न जाता आत्मविश्वासाने परीक्षा उत्तीर्ण होऊन आपले करिअर साध्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेतील स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ वाया न घालवता स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. यासाठी हिमतीने आणि आत्मविश्वासाने पुढे जात नियोजनपूर्ण अभ्यास करत आपले यश मिळवावे. महाविद्यालयामधील समृद्ध ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी खुले आहे. याचा फायदा घ्यावा. वर्तमानातला काळ पुन्हा आयुष्यात येणार नाही हे लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घालावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी डॉ. प्रताप काळे यांच्या विद्यार्थी काळातील स्वहस्तलिखित पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि महाविद्यालय गीताने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.परिमल सुतवणे, सूत्रसंचालन डॉ.विजय परसोडे तर आभार डॉ.माधव जाधव यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment