नाशिक शहरातील गुन्हेगारी नवीन नाही. अख्ख्या महाराष्ट्रात नाशिकचं नावं आता गुन्हेगारीसाठी घेतलं जाऊ लागलं आहे. अशातच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आणखी एक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या आरटीओ परिसरात दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी चक्क केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविल्याची घटना समोर आली आल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसह नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. सातत्याने घटनांनी नाशिक शहर हादरत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाशिक गुन्हेगारीबाबत काही दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होती. सामान्य नागरिक तर अशा घटनांमुळे दहशतीखाली आहेत. मात्र आता थेट केंद्रीय मंत्र्यांच्या आईचं मंगळसूत्र चोरट्यांने पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या आईचं मंगळसूत्र चोरटयांनी पळवल्याची घटना आरटीओ परिसरात घडली असून यात दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी दोन ते अडीच तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताबाई बागूल (७३, रा. दुर्गानगर, पेठरोड, मखमलाबाद) या भाजीपाला घेऊन पायी जात असताना समोरून पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भारती पवार यांच्या मातोश्री शांताबाई बागूल यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोनसाखळी खेचली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांचा नातू बाहेर आला. त्याने दुचाकीचा पाठलाग केला. मात्र, तोपर्यंत सोनसाखळी चोर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले होते.