नगर परिषद प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी बेईमान गुत्तेदारांना हाताशी धरून विकासाच्या नावावर कुठवर शेकणार स्वार्थाची पोळी ?
पुर्णा / केदार पाथरकर – पुर्णा नदीपात्रावरील कोल्हापूरी बंधाऱ्यात पाणी संपल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर शहरातील नागरिक पाणीटंचाईचा सामना करीत असतांनाच सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडण्यात आलं देवदेवा करुन दोन/चार दिवस पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तोच पुन्हा पाणीपुरवठा विभागातील पाणीपुरवठा करणारी विद्युत मोटारीत नेहमीप्रमाणे बिघाड झाला व पुन्हा शहरात पाणीटंचाईला सुरुवात झाली म्हणतात ‘ना नकटीच लग्न अन् सतराशे विघ्न’ एकंदर अशी परिस्थिती नगर परिषदेच्या निष्क्रिय धोरणामुळे नागरिकांना पाहावयास मिळत आहे एकीकडे मुस्लिम समाज बांधवांचा रमजान महिना सुरू आहे तर दुसरीकडे हिंदू समाज बांधवांचा होळी/धुलीवंदनाचा महत्त्वाचा अशा परिस्थितीत जवळपास आठ दिवसांपासून नगर परिषद मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे पाणीपुरवठा करणारी विद्युत मोटार नादुरुस्त असल्याची बतावणी करीत वेळ काढून नेत असल्याचे निदर्शनास येत आहे पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटार दुरुस्तीला आठ आठ दिवसांचा कालावधी लागत असेल तर लिकीज असलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्यातील पाणी वाहून गेल्यानंतर मोटर दुरुस्त करुन काय फायदा ? मोटार दुरुस्त होईपर्यंत पुन्हा कोल्हापूरी बंधारा कोरडाठाक पडणार नाही याची काय गॅरंटी ? कोल्हापूरी बंधाऱ्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी बंधाऱ्याच्या दरवाजांना मेनकापड (ताडपत्री) लावल्यावर नगर परिषद प्रशासनाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असेल असाच प्रकार पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारी संदर्भात देखील झाल्याचे बोलले जात आहे विद्युत मोटार बिघडली नाही तरी बिघाड दाखवून दुरुस्तीच्या नावावर आपले हात ओले करुन घेण्याचा प्रकार देखील अनेकवेळा घडल्याचे पाणीपुरवठा विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या तोंडून ऐकावयास मिळते.
पुर्णा नगर परिषद प्रशासनांतर्गत शहरातील विकासासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे असतांना कोट्यवधी रुपयांचा शासकीय विकासनिधी पदरात पाडून घेतला या शासकीय विकास निधीतून झालेली कोट्यवधी रुपयांची बोगस विकासकामे अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत ज्याप्रमाणे भुईसपाट झाली त्याच प्रमाणे जनतेचे सेवक म्हणुन मिरवणारे ‘संधीसाधू धनलोभी बंधू’ देखील भुमीगत झाल्याचे तमाम पुर्णेकरांना पाहावयास मिळाले पुर्णा नगर परिषदेतील भ्रष्ट नौकरशाह तत्वभ्रष्ट आजी/माजी लोकप्रतिनिधी आणि मर्जीतील बेईमान गुत्तेदारांनी शासनाकडून प्राप्त झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधीची अशी विल्हेवाट वाट लागली की शहराचा विकास कमी आणि शहर भकास मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
पुर्णा नगर परिषद प्रशासनाने शहरातील जुन्या वसाहतींमध्ये जवळपास तीन ते चार दशकांपूर्वी अंथरलेली पाणीपुरवठा पाईप लाईन व कोल्हापुरी बंधारा बांधकामानंतर अडीच दशकांपूर्वी कोल्हापूरी बंधारा ते जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंतची मुख्य पाईप लाईन वगळता नगर परिषद प्रशासनाने शहरातील नवीन वसाहती असलेल्या आनंद नगर,आदर्श कॉलनी,अमृत नगर,तात्यासाहेब नगर,पवार कॉलेज परिसर,बोर्डीकर प्लॉटिंग आदी परिसरामध्ये नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना न केल्यामुळे या परिसरातील नागरिकांचे उन्हाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत पाण्याअभावी अक्षरशः हालहाल होतात शासनाकडून प्राप्त झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीचा सदुपयोग करून नगर परिषद प्रशासनाने यातील पंचवीस टक्के निधी जरी पाणीपुरवठा योजनेवर केला असता तरी आज भर उन्हाळ्यात ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना पाण्याअभावी हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या नसत्या परंतु म्हणतात ना ‘चोर चोर मौसेरे भाई,मिलबाटकर सभीने सरकारी धनसंपत्ती लुटाई ? बंदर के हाथ लगी मानों मिठाई’ एकंदर अशी अवस्था पुर्णा नगर परिषद प्रशासनासह शहराची देखील झाल्याचे पाहावयास मिळत आहे पुर्णा नदीपात्रातील कोल्हापूरी बंधाऱ्यात मुबलक प्रमाणात असलेला पाणीसाठा वाहून जात असतांना शहरातील नागरिक मात्र नगर परिषद मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे व पाणीपुरवठा विभागाच्या निष्क्रिय व गलथान धोरणामुळे पाण्यासाठी दरबदर भटकंती करीत असल्याची दयनीय परिस्थिती पाहावयास मिळत असून पुर्णेतील नागरिक प्रथमच अक्षरशः पाण्याविना होळी/धुलीवंदनाचा सन साजरा करीत असल्याचे पाहावयास मिळत असून अशा या गंभीर परिस्थितीत नाईलाजास्तव नागरिकांना अव्वाच्या सव्वा दराने खाजगी पाणी विक्रेत्यांकडून पाणी विकत घेऊन पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे ही बाब निश्चितच नगर परिषद प्रशासनासाठी लाजीरवाणी म्हणावी लागेल परंतु निर्लज्जपणाचा बुरखा पांघरून भ्रष्ट कारभार हाकणाऱ्यांना ‘ना जनाची ना मनाची’ अशी हास्यास्पद परिस्थिती पुर्णा नगर परिषदेची झाली आहे…..