महायुतीमधील वाद :अजित पवार गट करणार भाजपा हायकमांडकडे तक्रार,’हे’ नेते निशाण्यावर

मुंबई,दि 19
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. यामुळे सर्वच पक्ष मतदारसंघांची चाचपणी करत आहेत. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील वाद शिगेला पोहोचल्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजप नेते वारंवार अजित पवार गटावर निशाणा साधत आहेत. तर दुसरीकडे महायुतीतील नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधाने सुरु आहेत. त्यामुळेच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवार गटाचे नेते भाजप नेत्यांची थेट दिल्लीत तक्रार करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून महायुतीच्या नेत्यांकडून अनेक वादग्रस्त विधाने केली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात सातत्यांनी त्यांची चर्चा सुरु आहे. त्यातच महायुतीतील नेते धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्यही करत आहेत. हिंदू-मुस्लिम समाजाबद्दल केलेले धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यामुळे महायुतीचे नेते चर्चेत आले आहेत. ही वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांमध्ये शिवसेना शिंदे गटातील संजय गायकवाड, संजय शिरसाट तसेच भाजप आमदार नितेश राणे, खासदार अनिल बोंडे यांसह अनेक नेत्यांचा समावेश आहे.

दिल्ली हायकमांडकडे तक्रार करणार
यावरुनच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवार गटाचे काही नेते हे धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य करणाऱ्या शिंदे गट आणि भाजप नेत्यांची थेट दिल्लीत तक्रार करणार आहेत. काही नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे विरोधकांकडून सातत्याने महायुतीची बदनामी होत आहे. यामुळे नागरिकांकडूनही संताप होत आहे. याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळेच अजित पवार गट थेट दिल्ली हायकमांडकडे तक्रार करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Comments (0)
Add Comment