मुंबई :
राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दिलेला शब्द फिरवला असून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. भाजपची सत्ता असलेल्या दिल्लीतील लाडक्या बहिणींना 2500 रुपये दिले जातात आणि महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना मात्र 1500 रुपये दिले जातात. महाराष्ट्रासोबत हा भेदभाव का केला जातोय असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी विचारला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “राज्य सरकारकडून यावेळी 2100 रुपये देणे अपेक्षित होतं. पण तेही दिलं गेलं नाही. दुसरीकडे दिल्लीतील लाडक्या बहिणींना 2500 रुपये दिले जातात. मग राज्यात कमी रक्कम का दिली जाते? आम्ही सत्तेत आलो असतो तर लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिले असते.”
लाडकी बहीण योजनेचा निधी का कमी केला?
गेल्या वर्षी लाडकी बहीण योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. आता त्यामध्ये घट करून 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा घाट असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. या योजनेतून कुणालाही कमी न करता सर्वाना लाभ मिळावा अशी मागणी त्यांनी केली.