मुंबई – आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आली. देवेंद्र फडणवीस हे स्वत: एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक सुरु असल्याची माहिती आहे. या घडामोडींमुळे सत्ता स्थापनेबाबत नवा सस्पेन्स निर्माण झालेला बघायला मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची आज वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये महायुतीच्या सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरु असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या भेटीसंदर्भात बोलताना किरण पावसकर यांनी म्हटलं की, “कोणत्याही मागण्यांसाठी महायुतीचं सरकार अडलेलं नाही. गिरीश महाजन यांनी देखील काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत”, असं त्यांनी म्हटलं.
किरण पावसकर यांनी पुढे म्हटलं की,”आमच्याकडून सांगण्यासारखी एक गोष्ट राहिली की, ज्या मंत्र्यांचं चारित्र्य चांगलं आहे. त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप नाहीत. अशा लोकांनाच पुन्हा संधी द्यावी, अशी एक कल्पना समोर आलेली आहे”.
महाराष्ट्राच्या राजकारणात आज काय-काय घडलं?
एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांचा दरेगावातील मुक्काम वाढला होता. शिंदे सलग दोन दिवस दरेगावात होते. त्यानंतर ते मुंबईत आले. पण प्रकृतीत सुधार न झाल्यामुळे ते ठाण्यातील निवासस्थानी आराम करत होते. या सर्व घडामोडींनंतर आज दुपारी एकनाथ शिंदे हे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात रुटीन चेकअपसाठी गेले. सर्व चेकअप झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेला रवाना झाले. एकनाथ शिंदे अवघ्या अर्ध्या तासात वर्षा बंगल्यावर दाखल झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महापरिनिर्वाण दिनासाठी काय-काय तयारी केली आहे याची आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
या बैठकीनंतर भाजपचे गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले. यावेळी गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. वर्षा बंगल्यातील अँटी चेंबरमध्ये शिंदे आणि महाजन यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यानंतर एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. यानंतर देवेंद्र फडणवीस हे स्वत: एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर आले.