४ लाख २८ हजार बालकांना देण्यात येणार जंतनाशक गोळ्या..

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त १३ फेब्रुवारी व मॉपअप दिन २० फेब्रुवारी रोजी ग्रामीण व शहरी भागातील १ ते १९ वर्षे वयोगटातील ४ लाख २८ हजार २३८ बालकांना जंतनाशक गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहेत.
परभणी जिल्ह्यात जंतनाशक दिन मोहिमेसाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग महिला व बालकल्याण विकास यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा दक्षता समिती सभेत सर्व बालकांपर्यंत जंतनाशक गोळ्या पोहोचवून त्यास ती खाऊ घालतील, तसे गोळ्या खाऊ घातलेल्या प्रत्येक बालकाची नोंदी ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिल्या आहेत. जंतनाशक दिनानिमित्त आयोजित जिल्हा दक्षता समिती सभेत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गीते, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ . संजकुमार पांचाळ, महिला व बालकल्याण अधिकारी विशाल जाधव, शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, मनपाच्या डॉ कल्पना सावंत, जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी सभेला उपस्थित होते.

आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील शाळा, विद्यालय, महाविद्यालय,तांत्रिक संस्था १५१४, अंगणवाडी केंद्र१६८६ तसेच २४९ आरोग्य संस्था आदी ठिकाणी जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी अल्बेंडाझोलची गोळी वयोगटांनुसार देण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी अंगणवाडी, शासकीय व निमशासकीय शाळा, विद्यालय, महाविद्यालय, तांत्रिक संस्था तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांना समुदाय स्तरावर अल्बेंडाझोल ची ही जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. या दिवशी सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील याची पालकांनी दक्षता घ्यावी. अनुपस्थित असणाऱ्या, आजारपणामुळे किंवा अन्य कारणामुळे अल्बेंडाझोलची गोळी सेवन न केलेल्या विद्यार्थ्यांना २० फेब्रुवारी रोजी आयोजित मॉपअप दिनी अल्बेंडाझोलची गोळी खाऊ घालण्याची सोय करण्यात आली आहे.

अल्बेंडाझोलची गोळी वयोगटांनुसार सेवन केल्यास कोणतेही दुष्परिणाम नसल्याने शासकीय, खाजगी शाळेत किंवा अंगणवाडीत विद्यार्थ्यांना अल्बेंडाझोलची गोळी वयोगटानुसार देण्यासाठी पालकांची संमतीची आवश्यकता नाही. परिणामी जंतनाशक गोळ्यांचे परिणाम व महत्त्व पटवून देण्यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. १ ते १९ वयोगटातील १०० टक्के विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहेत.
– डॉ. राहुल गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी

Comments (0)
Add Comment