परभणी – येथील शारदा महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करताना प्राचार्य डॉ. बबन पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामजिक परिवर्तन व आर्थिक मुक्तीसाठी संघर्ष केला असून जगातील सर्वश्रेष्ठ राज्य घटना निर्मितीचे महत्त्वाचे कार्य केले आहे. स्वांतत्र्य, समता, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता या तत्त्वावर आधारित आधुनिक भारताची उभारणी केल्यामुळे आज भारतीय समाज व्यवस्थेत त्यांच्या कार्यामुळे महत्त्वपूर्ण बदल झालेले दिसतात.
यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे, गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा. डॉ. संतोष नाकाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना उपप्राचार्य डॉ. वाघमारे म्हणाले की, देशामध्ये आनेक जाती, धर्म, पंथ असुन सुद्धा भारताला एकसंघ बांधण्याचे महान कार्य संविधानाद्वारे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. यावेळी डॉ. संतोष नाकाडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अविनाश पांचाळ यांनी केले तर आभार मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एन. व्ही. सिंगापुरे यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश जयपुरकर, कु. तनुजा रासवे, राजाराम मुत्रटकर यांनी प्रयत्न केले तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.