परभणी,दि 14 ः महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे काळाच्या पुढे जाऊन विचार मांडणारे विचारवंत होते. देशाचे ऊर्जामंत्री असताना त्यांनी शेतीविषयक धोरणांचा अभ्यास करीत नदीजोड प्रकल्प, जलविद्युत, हमीभाव याबाबत विचार मांडले. आज देशात शेतकरी आत्महत्या होत असताना बाबासाहेबांचे शेतीविषयक विचार रुजविणे गरजेचे असल्याचे मत व्याख्याते सुभाष ढगे यांनी सोमवार (ता.१४) रोजी व्यक्त केले.
शहरातील रविराजपार्क येथे आपुलकीचा सर्वधर्मीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुनील अहिरराव, प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.जयंत बोबडे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजरत्न शिरडकर हे उपस्थित होते. अगळ्यावेगळ्या भीमजयंतीच्या प्रसंगी पुढे बोलताना सुभाष ढगे म्हणाले, बाबासाहेबांनी जगातले सर्वांत महान कार्य केले ते म्हणजे संविधान निर्मिती. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून देशात सर्वांना अधिकार देण्याचे काम केले तसेच सामाजिक सलोखा निर्माण करून राष्ट्रनिर्मितीचे कामही केले. बाबासाहेब समाजसुधारक तर होतेच सोबतच ते शेतकऱ्यांचे कैवारी ही होते. महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम त्यांनी केले. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर अनेक पदव्या मिळवल्या व जगातल्या बुद्धीवंत व्यक्तिमत्त्व असल्याचा नावलौकिक कमावला. बाबासाहेबांचे विचार देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहचवणे गरजेचे असल्याचे ही ते म्हणाले. यावेळी डॉ.जयंत बोबडे यांनी बाबासाहेबांचे सामाजिक समतेसाठी दिलेले योगदान तसेच समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय ह्या त्यांच्या शिकवणीवर भर देत ते म्हणाले, बाबासाहेब दृष्टे विचारवंत होते. त्यांनी अस्पृश्य निवारणासाठी केलेले काम अद्वितीय आणि अतुलनीय आहे. आजच्या अस्थिर सामाजिक परिस्थितीत बाबासाहेबांचे विचारच समाजाला नवी दिशा देऊ शकतात. अशा वेळी बाबासाहेबांचे विचार प्रत्येक माणसाच्या डोक्यात रुजविण्याचे काम सर्वधर्मीय जयंतीच्या माध्यमातून होताना आनंद होतो आहे असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपात सर्वधर्मीय जयंतीचा उद्देश्य अधोरेखित करीत समाजमनाला बाबासाहेब समजून सांगणे हा आमचा उद्देश्य असल्याचे मत डॉ.सुनिल अहिरराव यांनी मांडले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गौतम बुद्ध, छ.शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन केले. सर्वधर्मीय जयंती साजरी करून सामाजिक ऐक्याचे संदेश देण्याचे काम आयोजकांनी केले आहे अशी चर्चा समाजमानातून होत आहे. पाच दिवस चाललेल्या उत्सवात विविध स्पर्धा, व्याख्यानाचे आयोजन ही करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमास जयराम मोडके, डॉ.दशरथ इबतवार, प्रा.डॉ.सुरेश शेळके, पंकज खेडकर यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.आनंद मनवर यांनी, सूत्रसंचालन डॉ. कीर्तिकुमार मोरे यांनी तर आभार डॉ. संजय जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती समितीचे समाधान मनवर, निशिकांत खेडकर, संदीप रणवीर, रमेश तिडके, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, अमोल सोनकांबळे, अमोल धाडवे, दिलिप मालसमिंदर, सुजीत धावरे, प्रा.रमेश रणवीर, विवेक आळणे, सरेंद्र भालेराव, धुराजी मगरे, संघपाल जोगदंड, अनंत मुळे, शिवा चव्हाण आदिनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी बहुसंख्येने युवक, महिला तसेच नागरिक उपस्थित होते.